'बोस, पटेलांकडील नेतृत्वामुळे चित्र वेगळे असते'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 04:32 AM2018-10-22T04:32:28+5:302018-10-22T04:32:42+5:30
भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांचे देशाला नेतृत्व अन् मार्गदर्शन लाभले असते, तर भारताचे भवितव्य निश्चितच बदलले असते.
नवी दिल्ली : भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांचे देशाला नेतृत्व अन् मार्गदर्शन लाभले असते, तर भारताचे भवितव्य निश्चितच बदलले असते. सुभाषबाबू, वल्लभभाई पटेल अन् डॉ.आंबेडकर यासारख्या अनेक महान सुपुत्रांच्या त्यागाला अन् बलिदानाला दुर्लक्षित करण्यात आले. श्रेयाचे सारे मोठेपण केवळ एका परिवाराला प्रदान करण्याचा प्रयत्न देशात वर्षानुवर्षे झाला हे दुर्दैवच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात आझाद हिंद सेनेच्या ७५ व्या वर्धापनदिनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून केले.
भारताच्या राष्ट्रनिर्मितीत प्रत्येक व्यक्तीला आपली भूमिका वठवण्याची संधी हा नेताजी सुभाषबाबूंच्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग होता, असे नमूद करीत पंतप्रधान पुढे म्हणाले की, केंब्रिज विद्यापीठात व्यतित केलेल्या कालखंडाची आठवण सांगताना नेताजी म्हणायचे, प्रत्येक भारतीयाच्या मनावर असे ठसवण्यात आले आहे की युरोप अन् ग्रेट ब्रिटनचे स्वरूप फार मोठे आहे, आपण त्याचे अनुकरण करायला हवे. म्हणूनच युरोप अन् इंग्लंडला एका वेगळया चष्म्यातून पाहण्याची आपल्याला सवय जडली आहे. सुभाषबाबूंच्या या विचारांना लक्षात घेऊन स्वतंत्र भारताची उभारणी झाली असती तर देशाचे चित्र नक्कीच वेगळे दिसले असते. सुभाषचंद्र बोस यांनी २१ आॅक्टोबर १९२३ साली ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात लढण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. स्वातंत्र्य संग्रामात या सेनेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. १९४३ साली सिंगापूरमध्ये भारताच्या आझाद हिंद सरकारची प्रतीकात्मक स्थापना केली. जगातल्या ११ देशांच्या सरकारांनी आझाद हिंद सरकारला त्यावेळी मान्यता दिली. या सरकारने काही देशांमध्ये आपले दूतावासही सुरू केले. याखेरीज तत्कालीन ब्रम्हदेश (सध्याचे म्यानमार) च्या सीमेवर आझाद हिंद सेनेने इंग्रजांच्या विरोधात युद्धही लढले होते.
या कार्यक्रमासाठी सुभाषबाबूंच्या परिवारातील काही सदस्य तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा उपस्थित होते. लाल किल्ला परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.