तरुणाला लावले मृत व्यक्तीचे दोन्ही हात, विज्ञानाचा चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 10:25 AM2023-07-18T10:25:18+5:302023-07-18T10:25:43+5:30
दोन हात, तब्बल 32 डाॅक्टर, 22 तास
कोलकाता : सरकारी रुग्णालय एसएसकेएमच्या डॉक्टरांनी २७ वर्षीय तरुणाला मृत व्यक्तीचे दोन्ही हात लावून नवा चमत्कार केला आहे. भारतातील वैद्यकीय शास्त्रातील ही एक दुर्मीळ घटना मानली जात आहे. तरुणाची प्रकृती सध्या स्थिर आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये शनिवारी पहाटे ५ वाजता सुरू झालेली शस्त्रक्रिया रविवारी पहाटे ३ वाजता संपली. ही शस्त्रक्रिया तब्बल २२ तास चालली. रुग्णालयातील ३२ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पथकाने हा चमत्कार केला. शस्त्रक्रियेनंतर तरुणाला २७ तास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सध्या तरुणाला सीसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत असताना शॉक लागल्याने तरुणाचे दोन्ही हात जळाले होते, असे शस्त्रक्रियेत सहभागी डॉक्टरांनी सांगितले.
शस्त्रक्रियेसाठी विशेष वैद्यकीय मंडळ स्थापन करून परवानगी घेण्यात आली. आणि अनेक चाचण्यांनंतर प्रत्यारोपण करण्यात आले. आता शरीर हात कधी स्वीकारेल हे पाहणे आव्हानात्मक आहे. यासाठी उच्च प्रतीची औषधे वापरली जात आहेत.
पत्नीने अवयवदानासाठी दिला होकार
९ जुलै रोजी हावडा येथील उलुबेरिया येथे हरिपद राणा एका रस्ता अपघातात गंभीर जखमी झाले होते. चार दिवसांनी ते ब्रेन डेड झाले. त्यानंतर रुग्णालयातून त्यांचा रक्तगट आणि पेशींची माहिती घेण्यात आली. त्याचवेळी बिराटी येथील रहिवासी असलेल्या इलेक्ट्रिशियन तरुणावर वर्षभरापासून एसएसकेएमच्या प्लास्टीक सर्जरी विभागात उपचार सुरू होते. त्याला दोन्ही हात हवे होते. रुग्णालयाने हरिपद यांच्या कुटुंबीयांना दोन्ही हात दान करण्याची विनंती केली. यावर हरिपद यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांनी अवयवदानासाठी होकार दिला.
सहसा अशा प्रकारे शरीराच्या फक्त अंतर्गत भागांचे प्रत्यारोपण केले जाते. दोन्ही हात प्रत्यारोपणाचे हे प्रकरण दुर्मीळ आहे.
-डॉ. राकेश जैन, प्लास्टिक सर्जन, एसएमएस मेडिकल कॉलेज