लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या दोन्ही पायलटचा मृत्यू; अरुणाचल प्रदेशात सकाळी कोसळलं होतं 'चित्ता'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 07:42 PM2023-03-16T19:42:04+5:302023-03-16T19:43:18+5:30
अरूणाचल प्रदेशातील मंडला हिल्सवर कोसळलेल्या लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या दोन्ही पायलटचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशात गुरुवारी सकाळी कोसळलेल्या लष्करी हेलिकॉप्टर 'चित्ता'च्या दोन्ही पायलटचा मृत्यू झाला आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. खंर तर सकाळी 9.15 च्या सुमारास या हेलिकॉप्टरने अरुणाचल प्रदेशातील बोमडिला जवळून उड्डाण केले होते.
दोन्ही पायलटचा मृत्यू
दरम्यान, उड्डाणानंतर थोड्याच वेळात हेलिकॉप्टरचा एटीसीशी संपर्क तुटला आणि बोमडिलाच्या पश्चिमेकडील मंडलाजवळ मोठा अपघात झाला. माहिती मिळताच वैमानिकांसाठी शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र, काही तासांनंतर दोन्ही वैमानिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सध्या अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. यासोबतच मृत वैमानिकांचे मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
Arunachal Pradesh | A pilot and co-pilot died after their Cheetah helicopter flying on an operational sortie crashed; the wreckage of the aircraft was found near Village Banglajaap East of Mandala. Court of enquiry being ordered: PRO Defence Guwahati pic.twitter.com/awHqFeHaa7
— ANI (@ANI) March 16, 2023
ग्रामस्थांच्या मदतीने मिळाली माहिती
माहितीनुसार, लेफ्टनंट आणि मेजरला घेऊन हेलिकॉप्टर आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील मिसामरीकडे जात होते. लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले की, सकाळी 9.15 च्या सुमारास हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (ATC) संपर्क तुटला. त्यामुळे ते बोमडिलाच्या पश्चिमेकडील मंडलाजवळ कोसळले. घटनेची माहिती मिळताच शोधपथके घटनास्थळी पाठवण्यात आली. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन सेलचे (SIC) पोलीस अधीक्षक रोहित राजबीर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक ग्रामस्थांनी दिरांगमध्ये अपघातग्रस्त हेलिकॉप्टर पाहिले आणि जिल्हा अधिकार्यांना माहिती दिली. दिरांगच्या बंगजलेप येथील ग्रामस्थांनी दुपारी 12.30 च्या सुमारास हेलिकॉप्टर शोधून काढले, ज्यामध्ये आग लागली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"