'त्या' दोघींनी किडनी देऊन वाचविले आपल्या भावाचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 01:04 PM2017-08-07T13:04:34+5:302017-08-07T15:31:10+5:30
बहिणीने भावाचे किडनी देऊन प्राण वाचविले आहेत.
मुंबई, दि. 7- भावा बहिणीची नात प्रत्येक नात्यापेक्षा वेगळं असतं. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीचं नेहमी रक्षण करण्याची जबाबदारी घेतो. राखी बांधल्यावर भाऊ आपल्या बहिणीला खास भेटवस्तूही देतो. भावाकडून रक्षाबंधनाच्या दिवशी भेटवस्तू मिळविण्याची परंपराचं आहे. पण अशीही उदाहरण आहेत जिथे बहिणीने भावाचे किडनी देऊन प्राण वाचविले आहेत. जयपूर आणि उत्तरप्रदेशातील या दोन महिलांनी भावाला किडनी देऊन त्यांचे प्राण वाचविले आहेत. जयपूरमधील संगानेरमध्ये राहणाऱ्या 43 वर्षीय सावित्री देवी यांनी त्यांचा भाऊ बलराम सैनी यांना किडनी दिली. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील वंदना चंद्रा यांनीही त्यांचा भाऊ विवेक साराभॉय यांना किडनी देऊन त्यांचे प्राण वाचविले आहेत.
जयपूरमध्ये राहणाऱ्या सावित्री देवी यांचा भाऊ बलराम सैनी यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपण करायला सांगितलं होतं. बलराम त्यांना किडनी देणाऱ्या व्यक्तीच्या शोधात होते. घरातील व्यक्तीची बलराम यांना किडनी मिळावी, याचा शोध ते घेत होते. मला तीन बहिणी आहेत आणि माझा किडनीचा मुद्दा समोर आल्यावर त्या तिघीही मला किडनी देण्यासाठी पुढे सरसावल्या. पण त्या तिघींपैकी दोघी जणी वैद्यकियदृष्ट्या फिट नव्हत्या. म्हणून माझी मोठी बहिण सावित्री हिने मला किडनी द्यायचं ठरवलं, असं सैनी म्हणाले आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी खरंतर बहिणीचं रक्षण करण्याची जबाबदारी भाऊ घेतो पण इथे माझ्या बहिणीने माझं आयुष्य वाचविल्याची भावना सैनी यांनी व्यक्त केली आहे. मी तिला कितीही मोठी भेट दिली तरी तिच्या या भेटीपेक्षा ती कधीच मोठी नसेल, असंही ते म्हणाले.
रक्षाबंधनाचं असंच एक उदाहरण उत्तर प्रदेशातही बघायला मिळालं. उत्तर प्रदेशात बहिणीनेच भावाला किडनीची भेट देऊन त्याचे प्राण वाचविल्याची अनोखी घटना घडली आहे. विशेष म्हणजे तो आजच रक्षाबंधनाच्या दिवशी हॉस्पिटलमधून घरी येणार आहे. वंदना चंद्रा असं या महिलेचं नाव आहे. तिचा भाऊ विवेक साराभॉय हे आग्रा जिल्हा न्यायालयात वरिष्ठ वकील आहेत. आजारपणामुळे विवेक यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या. त्यांना किडन्या मिळाव्यात म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी एम्स, लखनऊचे पीजीआय हॉस्पिटल, वेदांता हॉस्पिटल आणि अपोलो हॉस्पिटलसहीत अनेक हॉस्पिटल्स पाहिली. पण त्यांना किडनी दान करणारं कुणी मिळालं नाही. विवेक यांची प्रकृती खालावत असताना वंदना यांनी त्यांना किडनी देण्याचा निर्णय घेतला. वंदना यांचं लग्न झालेलं असून त्यांना १२ वर्षाची एक मुलगी आहे. माझं भावावर प्रेम आहे. संकटाच्या काळात तो नेहमीच माझ्यापाठी खंबीरपणे उभा राहिला. अशा नाजूक प्रसंगी त्याचा जीव वाचविणं हेच महत्त्वाचं होतं. त्याला किडनी दिली आणि त्याचा जीव वाचला. त्यामुळे यंदाचा रक्षाबंधन माझ्यासाठी विशेष आहे, असं वंदना म्हणाल्या.