दोघेही होते मुख्यमंत्री, आता मैदानात, काय होणार? झारखंडमधील पहिल्या टप्प्यात चार मतदारसंघांसाठी निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 08:28 AM2024-05-09T08:28:05+5:302024-05-09T08:28:20+5:30
झारखंडमधील पहिल्या चरणात सिंहभूम, पलामू, लोहरदगा व खुंटी या चार लोकसभा मतदारसंघांसाठी १३ मे रोजी मतदान होत असून, एकूण ४५ उमेदवार रिंगणात आहेत.
किरण अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
रांची : झारखंडमधील पहिल्या टप्प्यात चार मतदारसंघांसाठी निवडणूक होऊ घातली असून, यात दोघा माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा स्वतः उमेदवार असून, माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी, राज्यातील काँग्रेसच्या एकमेव खासदार असलेल्या गीता कोडा यंदा भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
झारखंडमधील पहिल्या चरणात सिंहभूम, पलामू, लोहरदगा व खुंटी या चार लोकसभा मतदारसंघांसाठी १३ मे रोजी मतदान होत असून, एकूण ४५ उमेदवार रिंगणात आहेत. यात खुंटी येथे केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्यासमोर काँग्रेसचे माजी आ. कालीचरण मुंडा यांचे तर, सिंहभूमच्या जागेवर खा. गीता कोडा यांच्यासमोर ‘झामुमो’च्या माजी मंत्री, आ. जोबा मांझी यांचे आव्हान आहे. पलामू येथून भाजपाचे बीडी राम व लोहरदगा येथे समीर उराव या दोन्ही विद्यमान खासदारांसमोर अनुक्रमे राजदच्या ममता भुनिया व काँग्रेसचे माजी आ. सुखदेव भगत प्रामुख्याने निवडणूक रिंगणात आहेत. ममता या सुमारे महिनाभरापूर्वीच भाजपा सोडून ‘राजद’मध्ये आल्या आहेत.
झारखंडमधील एकूण १४ जागांसाठी चार टप्प्यांत मतदान होणार आहे. यात महायुती अंतर्गत भाजपा १३ व आजसु एक जागा तर इंडिया आघाडी अंतर्गत काँग्रेस ७, झामुमो ५ व राजद आणि भाकपा (माले) प्रत्येकी एकेका जागेवर लढत आहेत.
छाप्यात कोट्यवधी जप्त...
निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राज्याचे ग्रामीण विकासमंत्री आलमगीर आलम यांच्या खासगी सचिवाच्या सहायकाकडे ईडीने टाकलेल्या धाडीत कोट्यवधींची रोख रक्कम हाती लागली आहे, यावरून भाजपाने काँग्रेसला घेरले आहे. आलम यांनी मात्र याबाबत आपणास काही माहीत नसल्याचे म्हटले आहे.