टमाट्याच्या सुरक्षेसाठी तैनात केले बाऊन्सर; वाढत्या महागाईच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 08:25 PM2023-07-09T20:25:52+5:302023-07-09T20:27:54+5:30
देशभरात 15 ते 20 रुपये किलोने विकला जाणारे टमाटे आज 130 ते 160 रुपये किलोने विकले जात आहेत.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये टोमॅटोचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. 15 ते 20 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आज 130 ते 160 रुपये किलोने विकला जात आहे. भाज्यांच्या वाढत्या किमती पाहता वाराणसीतील एका भाजी विक्रेत्याने त्याच्या दुकानावर चक्क बाऊन्सर(सेक्युरिटी गार्ड) लावले. या बाऊन्सर्सना खास टोमॅटोच्या सुरक्षेसाठी नियुक्त केले. भाजीच्या दुकानात बाऊन्सर्स पाहून खरेदीला येणाऱ्या नागरिकांचीही तारांबळ उडाली.
याबाबत भाजी विक्रेत्याला विचारले असता त्यानी सांगितले की, सध्या टोमॅटोचे भाव खूप वाढले आहेत. टोमॅटो खरेदी करण्यासाठी येणारे लोक वाद घालतात. वाद होऊ नये म्हणून दुकानात दोन बाऊन्सर स्वतःच्या आणि टोमॅटोच्या सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. सर्व टोमॅटो विकले जातील, तेव्हा या बाऊन्सरचे काम संपेल.
दरम्यान, हा भाजीविक्रेता समाजवादी पार्टीच्या कार्यकर्ता असून, त्याने महागाईच्या निषेधार्थ केलेले हे अनोखे आंदोलन आहे. सपा कार्यकर्ता अजय फौजीने पीटीआयला सांगितले की, वाढत्या महागाईच्या निषेधार्थ त्याने त्याच्या दुकानात बाऊन्सर तैनात केले आहे. त्यानी एक पोस्टरही लावले आहे, ज्यामध्ये आधी पैसे मग टोमॅटो असे लिहिले आहे. अजय फौजीने सांगितले की, काही लोक टोमॅटो खरेदी करताना वाद घालतात, टोमॅटोची लूटही करत आहेत. आम्हाला कोणत्याही प्रकारचा वाद नकोय, त्यामुळे बाऊन्सर ठेवले आहेत. हे अनोखे आंदोलन चर्चेचा विषय बनले आहे.
यापूर्वीही अजय फौजी चर्चेत आले
वाराणसीमध्ये टोमॅटोच्या संरक्षणासाठी बाऊन्सर लावणारे अजय फौजी हे सपा कार्यकर्ते आहेत. टोमॅटोच्या भाववाढीविरोधात ते अनोखे आंदोलन करत आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब अशाप्रकारच्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे. त्यांचे वडील सतीश फौजी यांनी मायावतींच्या हेलिकॉप्टरला उतरण्यास विरोध केला होता. याशिवाय अजय फौजी काळे झेंडे घेऊन पंतप्रधान मोदींना विरोध करण्यासाठी पोहोचले होते. पीएम मोदींच्या ताफ्याचे वाहन येताना पाहून त्यांनी उडीही मारली होती.