बाउन्सरांना बोलावून कॅम्पस रिकामा करण्यास सांगितलं, अनेकांना नोकरीवरुन काढलं; इन्फोसिसवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:15 IST2025-02-13T15:13:24+5:302025-02-13T15:15:02+5:30

इन्फोसिसमधून अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे.

Bouncers were called and asked to vacate the campus, many were fired Serious allegations against Infosys | बाउन्सरांना बोलावून कॅम्पस रिकामा करण्यास सांगितलं, अनेकांना नोकरीवरुन काढलं; इन्फोसिसवर गंभीर आरोप

बाउन्सरांना बोलावून कॅम्पस रिकामा करण्यास सांगितलं, अनेकांना नोकरीवरुन काढलं; इन्फोसिसवर गंभीर आरोप

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने ४०० ट्रेनी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता इन्फोसिसवर सर्व स्तरातून आरोप होत आहेत. दरम्यान, यावर इन्फोसिसने प्रतिक्रिया दिली आहे. मूल्यांकनात तीन वेळा अपयश आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती कंपनीकडून दिली आहे. ही प्रक्रिया दोन दशकांपासून सुरू आहे आणि या अंतर्गत प्रशिक्षणार्थीला तीन प्रयत्नांमध्ये असेसमेंट उत्तीर्ण होणे अनिवार्य असते.

युक्रेन-रशिया युद्ध थांबणार? डोनाल्ड ट्रम्प यांची पुतीन-झेलेन्स्कींसोबत फोनवरून चर्चा

"सर्व प्रशिक्षणार्थींना असेसमेंट उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी दिल्या जातात आणि जर ते अयशस्वी झाले तर ते कंपनीत पुढे काम करु शकत नाहीत, असे इन्फोसिसने पीटीआयला सांगितले.

इन्फोसिसमधील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे हे प्रकरण म्हैसूर कॅम्पसचे आहे. हे कर्मचारी सप्टेंबर २०२४ मध्ये कंपनीत रुजू झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना काढून टाकण्याची प्रक्रिया अतिशय पद्धतशीर पद्धतीने करण्यात आली. सकाळी ९:३० वाजल्यापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या लॅपटॉपसह ५०-५० जणांच्या बॅचमध्ये बोलावण्यात आले. यावेळी सुरक्षा कर्मचारी आणि बाउन्सर देखील तिथे उपस्थित होते.

दरम्यान, आता या निर्णयावरुन कंपनीवर टीका होत आहे. तरुणांना कॅम्पस सोडण्यासाठी थोडा वेळही देण्यात नाही असा आरोप होत आहे. एका महिला कर्मचाऱ्याने व्यवस्थापनाला रात्री राहण्याची परवानगी मागितली, पण त्यांना सायंकाळी ६ वाजेपर्यंत कॅम्पस सोडण्याचे आदेश देण्यात आले. कर्मचारी म्हणाले, "मी उद्या जाईन. आता कुठे जाऊ?" अधिकाऱ्यांनी उत्तर दिले, "आम्हाला माहित नाही, तुम्ही आता कंपनीचा भाग नाही."

सर्वच कर्मचारी २०२२ च्या बॅचचे

काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांपैकी अनेकजण २०२२ च्या बॅचमधील अभियंते आहेत. त्यांनी इन्फोसिसच्या म्हैसूर कॅम्पसमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. दरम्यान,आता आयटी कर्मचारी संघटनेच्या एनआयटीईएसने इन्फोसिसवर नोकरी रद्द करण्याच्या प्रक्रियेदरम्यान धमकावल्याचा आरोप केला आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना धमकावण्यासाठी बाउन्सर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा वापर केला आणि त्यांना मोबाईल फोन ठेवू दिले नाहीत, जेणेकरून ते घटनेचे फोटो घेतील किंवा कोणाचीही मदत घेऊ शकणार नाहीत, असा आरोप NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंह सलुजा यांनी केला.

Web Title: Bouncers were called and asked to vacate the campus, many were fired Serious allegations against Infosys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.