महाराष्ट्रातील ‘खोके’ पोहोचले गुजरातमध्ये! भाजप म्हणते विकासात ‘ओके’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 07:02 AM2022-11-21T07:02:37+5:302022-11-21T07:03:21+5:30
काँग्रेसकडून शिवाजीराव मोघे, रामकृष्ण ओझा हे विदर्भातील नेते स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. मोघे सूरतमध्ये तळ ठोकून आहेत.
कमलेश वानखेडे -
नागपूर : हायप्रोफाईल राज्य असलेल्या गुजरात निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. गुजरातच्या निवडणूक प्रचारात विदर्भातील काँग्रेस-भाजप नेत्यांची कुमक उतरली आहे. काँग्रेस नेते महाराष्ट्रातील ‘खोके’ राजकारणाचा पाढा गुजरातींसमोर वाचत आहेत. तर गुजरातसह महाराष्ट्र भाजपमुळेच विकासात ‘ओके’ असल्याचे भाजप नेते ठासून सांगत आहे. एकूणच गुजरातच्या भूमीत विदर्भातील नेत्यांचे युद्ध रंगताना दिसत आहे.
भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. गेल्या आठवड्यात मुनगंटीवार गुजरातला जाऊन आले. सध्या बावनकुळे तीन दिवस मुक्कामी आहेत. गडकरी-फडणवीस यांची तोफदेखील पुढील आठवड्यात धडाडणार आहे.
गुजरात राजकारण तापवतोय महाराष्ट्र
- राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माजी मंत्री सुनील केदार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, माजी मंत्री वसंत पुरके हेदेखील प्रचारात सहभागी होणार आहेत.
- माजी मंत्री विजय वडेट्टीवार हे याच आठवड्यात गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत.
- एकूणच विदर्भातील काँग्रेस-भाजप नेते गुजरातमधील राजकीय वातावरण तापवणार आहेत.
काँग्रेसकडून शिवाजीराव मोघे, रामकृष्ण ओझा हे विदर्भातील नेते स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. मोघे सूरतमध्ये तळ ठोकून आहेत.