काश्मिरातील संघर्षात मुलगा ठार
By admin | Published: September 1, 2016 04:31 AM2016-09-01T04:31:01+5:302016-09-01T04:31:01+5:30
काश्मीर खोऱ्यातील काही भागांत पुन्हा हिंसाचार सुरू झाला असून, हिंसक जमावाने बुधवारी पीडीपीचे खासदार नाझीर लावे यांच्या कुलगाममधील निवासस्थानाला आग लावली
श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील काही भागांत पुन्हा हिंसाचार सुरू झाला असून, हिंसक जमावाने बुधवारी पीडीपीचे खासदार नाझीर लावे यांच्या कुलगाममधील निवासस्थानाला आग लावली. सुदैवाने त्यात कोणी जखमी झाले नसले तरी घराचे मात्र नुकसान झाले. तसेच बारामुल्ला जिल्ह्यात हिंसक निदर्शक आणि सुरक्षा दलातील चकमकीत १५ वर्षांचा मुलगा बुधवारी ठार झाला. यामुळे खोऱ्यात सुरू असलेल्या हिंसाचारातील बळींची संख्या वाढून ६९ झाली.
बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दगडफेक करणाऱ्या निदर्शकांवर सुरक्षारक्षकांनी कथितरीत्या केलेल्या गोळीबारात दानीश मंजूर व इतर सहा जखमी झाले. लादोरा भागात ही घटना घडली. दानीशला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात येत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. प्रशासनाने ५३ दिवसांनंतर आज संपूर्ण खोऱ्यातील संचारबंदी उठविली असताना ही चकमक झाली.
काश्मिरात आजघडीला कुठेही संचारबंदी नाही.
अगदी श्रीनगरमधील एम.आर. गंज आणि नौहट्टा भागातील संचारबंदीही उठविण्यात आली आहे. स्थिती सुधारल्यामुळे प्रशासनाने संचारबंदी उठविण्याचा निर्णय घेतला असला तरी काही भागांत हिंसाचाराचे तुरळक प्रकार सुरूच आहेत. खोऱ्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संवेदनशील भागात सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.