३ वर्षे वय, आईचा मृत्यू; अन्नदान कार्यक्रमात वडील-मुलाची तब्बल १० वर्षांनी भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 05:42 AM2023-06-05T05:42:03+5:302023-06-05T05:42:49+5:30

या दोघांची भेट झाली तेव्हा वडील आणि मुलाने एकमेकांना मिठी मारली आणि त्यांचे डोळे भरून आले.

boy meets suddenly after ten years to his father | ३ वर्षे वय, आईचा मृत्यू; अन्नदान कार्यक्रमात वडील-मुलाची तब्बल १० वर्षांनी भेट

३ वर्षे वय, आईचा मृत्यू; अन्नदान कार्यक्रमात वडील-मुलाची तब्बल १० वर्षांनी भेट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, रामगढ (झारखंड) : आईच्या मृत्यूवेळी त्याचे वय होते केवळ ३ वर्षे. आईच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी वडिलांना अटक केली आणि या मुलाच्या आयुष्याची फरपट सुरू झाली. वडिलांची कधीतरी भेट व्हावी, असे त्याला नेहमी वाटायचे. तो योग नुकताच जुळून आला आणि झारखंडच्या रामगढ जिल्ह्यात एका संस्थेने आयोजित केलेल्या अन्नदान कार्यक्रमात त्याची वडिलांशी भेट झाली तेव्हा या दोघांनीही अश्रूंना वाट करून दिली.   

टिंकू वर्मा असे या वडिलांचे नाव आहे. त्यांना पोलिसांनी २०१३ मध्ये पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर अटक केली होती. शुक्रवारी दुपारी मोफत अन्न वाटपाच्या वेळी ते रांगेत बसले होते. योगायोगाने त्यांचा मुलगा शिवम लोकांना जेवण देत होता. मुलाने त्या माणसाला पाहिले आणि त्याला वाटले की, या दाढीवाल्या माणसाचा चेहरा त्याच्या वडिलांसारखा आहे. टिंकू वर्मानेही आपल्या मुलाला ओळखले. टिंकू वर्माला अटक केल्यानंतर त्यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ‘दिव्य ओंकार मिशन’ या अनाथ आणि गरीब मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेकडे त्याला सुपूर्द केले होते. तेव्हा शिवम तीन वर्षांचा होता. 

रामगढ जिल्ह्यात जेव्हा या दोघांची भेट झाली तेव्हा वडील आणि मुलाने एकमेकांना मिठी मारली आणि त्यांचे डोळे भरून आले. या भावनिक क्षणाने संस्थेचे व्यवस्थापक राजेश नेगी यांच्यासह उपस्थितांनाही अश्रू आवरणे कठीण झाले.

शिवमला दिले वडिलांच्या ताब्यात 

शिवम आता आठवीत शिकत आहे. नेगी यांनी सांगितले की, संस्थेने आयोजित केलेल्या अन्न वितरण कार्यक्रमात तो नेहमीच भाग घेतो. शिवमचे वडील सध्या रामगढ शहरातील विकास नगर भागात राहतात आणि रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. सर्व अधिकृत औपचारिकता पूर्ण केल्यानंतर शिवमला त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. आपल्या मुलाची १० वर्षे काळजी घेतल्याबद्दल त्याच्या वडिलांनीही संस्थेचे आभार मानले.

आयुष्यात मी माझ्या वडिलांना कधी भेटेन असे मला वाटले नव्हते. त्यांना भेटणे हे एका दैवी देणगीपेक्षा कमी नव्हते. - शिवम,  मुलगा.


 

Web Title: boy meets suddenly after ten years to his father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.