गुलाम अलींनंतर आता पाकिस्तानी पहलवानांवरही बहिष्कार
By admin | Published: October 10, 2015 03:11 PM2015-10-10T15:11:07+5:302015-10-10T15:14:04+5:30
भारत-पाकिस्तनमधील तणावपूर्ण संबंधांमुळे प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली खान यांचा भारतातील कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे वाद सुरू असतानाच आता भारताने पाकिस्तानी पहलवानांवरही बहिष्कार टाकला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. १० - भारत-पाकिस्तनमधील तणावपूर्ण संबंधांमुळे प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली खान यांचा भारतातील कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे सुरू असलेला वाद ताजा असतानाच आता भारताने पाकिस्तानी पहलवानांवरही बहिष्कार टाकला आहे. वैष्णोदेवी येथे नवरात्रीदरम्यान दंगल आखाड्यात होणा-या कुस्ती स्पर्धेसाठी पाकिस्तानी पहलवानांना आमंत्रणच देण्यात आलेले नाही.
या स्पर्धेचे आयोजक शिवकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी या स्पर्धेसाठी पाकिस्तानी पहलवानांना निमंत्रित करण्यासंबंधीचे निवेदन देण्यात आले होते व ते मंजूर झाल्यानंतर व्हिसाही मिळाला होता, पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने पाकिस्तानी पहलवानांना स्पर्धेसाठी न बोलावण्याची सल्ला दिला. यावर्षीही दोन्ही देशांतील संबंध बिघडलेलेच असल्याने पहलवानांना स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले नाही, असे शर्मा यांनी सांगितले.
भारताची १९४७ साली फाळणी झाल्यानंतर २००५ साली पहिल्यांदाच पाकिस्तानी पहलवानांना दंगल स्पर्धेसाठी निमंत्रण देण्यात आले होते, त्यानंतर २०१०२ पर्यंत दरवर्षी त्यांना स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात येत असे. भारत व पाकिस्तानच्या या पहलवानांदरम्यान रंगणारा कुस्तीचा हा खेळ खूप लोकप्रिय झाला होता व तो पाहण्यासाठी लोक लांबून येत असतं, असे शर्मा म्हणाले.
२०१२ साली पेशावरमध्ये भारतीय पहलवानांची डंका वाजला होता, त्यावेळी पाकिस्तानी नागरिकांनी त्यांची खूप खातीरदारीही केली होती. मात्र २०१३ साली भारतीय सैनिकांचे शीर कापण्यात आल्याच्या घटनेनंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आणि पाकिस्तानी पहलवान या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाहीत.
त्यानंतर गेली दोन वर्ष हा सिलसिला कायम असला तरी पुढील वर्षी त्यांना या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन शर्मा यांनी दिले. भविष्यात केंद्र व राज्य सरकार दोन्ही देशातील कलाकार, खेळाडूंना एकमेकांच्या देशाता जाण्यास परवानगी देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.