जेवण बनविण्यावरून झालेल्या भांडणात मुलीने केली बॉयफ्रेण्डची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 10:34 AM2017-08-21T10:34:22+5:302017-08-21T10:36:34+5:30
जेवण बनविण्यावरून झालेल्या वादात मुलीने बॉयफ्रेण्डची हत्या केल्याची घटना घडली आहे.
नवी दिल्ली, दि. 21- जेवण बनविण्यावरून झालेल्या वादात मुलीने बॉयफ्रेण्डची हत्या केल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील उत्तम नगर भागात शनिवारी ही घटना घडली आहे. जेवण कोण बनवणार यावरून दोघांमध्ये झालेला वाद विकोपाला गेल्याने मुलीने तिच्या बॉयफ्रेण्डवर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. इजू मूल असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो नायझेरियाचा राहणार असल्याची माहिती मिळते आहे. पोलिसांच्या मते आरोपी एल्वी उजुम्मा हिने याआधीही रागात तिच्या बॉयफ्रेण्डवर चाकूने हल्ला केला होता. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उजुम्माने इजूला शनिवारी दुपारी घरी यायला सांगितलं होतं. त्यानंतर त्या दोघांमध्ये एका विषयावरून भांडण झालं होतं. त्या दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकुन शेजारच्या लोकांनी त्यांची भांडण थांबवली. पण शेजारची लोक गेल्यावर परत त्यांच्यात भांडण सुरू झाली. त्या भांडणात उजुम्माने इजूची हत्या केली. जेवण कोण बनवणार यावरून आमचा वाद सुरू झाला. भांडण जास्त झाल्यावर इजूने मारहाण केल्याचं उज्जूमाने सांगितलं.
आरोपी महिलेच्या मते तिने फक्त बॉयफ्रेण्डला घाबरवण्यासाठी चाकू बाहेर काढला होता. पण त्यानंतरही इजूने तिला मारायला पुढे आला होता. स्वतःला वाचविण्यासाठी मी त्याच्यावर हल्ला केला आणि नंतर स्वतःला खोलीत बंद केलं, असं आरोपी महिलेने सांगितलं आहे. यानंतर उजुम्मा खोलीतून बाहेर आल्यावर तिने इजूला रक्तबंबाळ झालेलं पाहिलं.उजुम्माने तिच्या काही मित्रांच्या मदतीने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केला. पण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांच्या मते, इजुला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर उजुम्मा घर गेली आणि तिने स्वतःला खोलीत बंद करून ठेवलं. सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरी जाऊन तपास करून तिला अटक केली. उजुम्मा त्या घरात गेल्या तीन महिन्यापासून राहत असून तिचा बॉयफ्रेण्ड नेहमी तिला भेटायला घरी यायचा, असं तिच्या घरातील केअरटेकरने सांगितलं आहे.
शनिवारी संध्याकाळी त्या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. तो मुलगा याआधीही घरी यायचा पण त्यांना असं भांडताना कधी पाहिलं नव्हतं. काहीवेळानंतर इजूच्या गर्लफ्रेण्डला काही मित्रांसोबत इजूला रक्ताने बरबटलेल्या अवस्थेत रिक्षेतून नेताना पाहिल्याचं, शेजाऱ्यांनी सांगितलं आहे.