बीपी-शुगरनंतर आता सापडली कॅन्सरची बनावट औषधं; 7 जणांना अटक, 'असा' झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 11:20 AM2024-03-13T11:20:40+5:302024-03-13T11:21:45+5:30

दिल्लीबाहेरून येणारे रुग्ण, विशेषत: हरियाणा, बिहार, नेपाळ किंवा आफ्रिकन देशांतून येणाऱ्या रुग्णांना हे आरोपी आपल्या जाळ्यात अडकवायचे.

bp sugar medicines delhi police raided fake cancer injections racket busted delhi gurugram | बीपी-शुगरनंतर आता सापडली कॅन्सरची बनावट औषधं; 7 जणांना अटक, 'असा' झाला पर्दाफाश

बीपी-शुगरनंतर आता सापडली कॅन्सरची बनावट औषधं; 7 जणांना अटक, 'असा' झाला पर्दाफाश

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने बनावट औषधांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सात जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी दोन आरोपी दिल्लीतील एका मोठ्या कॅन्सर हॉस्पिटलचे कर्मचारी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून एकूण नऊ ब्रँडची बनावट कॅन्सरची औषधं जप्त केली आहेत. यातील सात औषधं विदेशी ब्रँडची आहेत तर दोन बनावट औषधं भारतातील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हॉस्पिटलमधील रुग्णांना केमोथेरपीमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनच्या रिकाम्या बॉटल्स गोळा करायचे, नंतर त्या बॉटल्समध्ये अँटीफंगल औषध भरून विकायचे. दिल्लीबाहेरून येणारे रुग्ण, विशेषत: हरियाणा, बिहार, नेपाळ किंवा आफ्रिकन देशांतून येणाऱ्या रुग्णांना हे आरोपी आपल्या जाळ्यात अडकवायचे.

सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये विफल जैन, सूरज शत, नीरज चौहान, परवेझ, कोमल तिवारी, अभिनय कोहली आणि तुषार चौहान अशी त्यांची नावे आहेत. यातील नीरज हा गुरुग्रामचा रहिवासी आहे तर उर्वरित सहा दिल्लीतील विविध भागातील रहिवासी आहेत. गुन्हे शाखेच्या विशेष आयुक्त शालिनी सिंह यांनी सांगितलं की, त्यांच्या टीमला माहिती मिळाली आहे की दिल्लीत एक टोळी सक्रिय आहे, जी रुग्णांना बनावट कॅन्सरची औषधं पुरवत आहे. यानंतर आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं.

गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला असता त्यांना चार वेगवेगळ्या ठिकाणांहून हे नेटवर्क चालवले जात असल्याची माहिती मिळाली. आरोपींना पळून जाण्याची संधी मिळू नये म्हणून पोलिसांनी चारही ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्याचे नियोजन केले. मोती नगर, दिल्लीचे डीएलएफ कॅपिटल ग्रीन्स, गुडगावची साऊट सीटी, दिल्लीचे यमुना विहार यांचा समावेश होता.

दिल्ली पोलिसांच्या पथकाने या रॅकेटचा सर्वात महत्त्वाचा अड्डा असलेल्या डीएलएफ कॅपिटल ग्रीन्सवर छापा टाकला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विफल जैन हा येथे कॅन्सरची बनावट औषधे बनवत असे. या संपूर्ण टोळीचा म्होरक्याही विफल होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने डीएलएफ ग्रीन्समध्ये दोन ईडब्ल्यूएस फ्लॅट भाड्याने घेतले होते. याठिकाणी तो कॅन्सरच्या रिकाम्या औषधाच्या बॉटल्स बनावट औषधांनी भरायचा तर त्याचा साथीदार सूरज या रिफिल केलेल्या बॉटल्स व्यवस्थित पॅक करून ठेवायचा जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये.

पोलिसांनी येथून अशा 140 बॉटल्स जप्त केल्या. यावर Opdata, Keytruda, Dextrose, Fluconazole अशा ब्रँडची नावे लिहिली होती. या ब्रँडच्या बॉटल गोळा करून त्यामध्ये बनावट कॅन्सर इंजेक्शन्स भरण्यात आलं. यामध्ये अँटीफंगल औषध असल्याचं तपासात निष्पन्न झालं. पोलिसांनी या ठिकाणाहून 50 हजार कॅश, 1000 अमेरिकी डॉलर, बॉटल्स सील करणाऱ्या तीन मशीन्स, एक हिटगन मशीन आणि 197 रिकाम्या बॉटल्स जप्त केल्या आहेत. यासोबतच पॅकेजिंगशी संबंधित सामान देखील जप्त केले आहे. 
 

Web Title: bp sugar medicines delhi police raided fake cancer injections racket busted delhi gurugram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.