बीपीएल महिलांना दीड कोटी गॅस कनेक्शन
By admin | Published: April 8, 2016 03:05 AM2016-04-08T03:05:56+5:302016-04-08T03:05:56+5:30
चालू आर्थिक वर्षात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील (बीपीएल) महिलांना दीड कोटी, तर येत्या तीन वर्षांत पाच कोटी कनेक्शन पुरविले जाणार असल्याचे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी येथे सांगितले.
बडोदा : चालू आर्थिक वर्षात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील (बीपीएल) महिलांना दीड कोटी, तर येत्या तीन वर्षांत पाच कोटी कनेक्शन पुरविले जाणार असल्याचे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी येथे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने बीपीएल कुटुंबातील महिलांना राज्य सरकारांच्या सहभागातून गॅस कनेक्शन पुरविण्याबाबत नव्याने पुढाकार घेतला आहे.
मोदींनी केलेल्या आवाहनावरून ९६ लाख सधन लोकांनी गॅस सबसिडी सोडली आहे. ही रक्कम बीपीएल कुटुंबातील महिलांना गॅस कनेक्शन देण्यासाठी उपयोगात आणली जात आहे, असे ते म्हणाले.
धुराच्या शापातून मुक्तता....
एलपीजी कनेक्शनचा प्रारंभीचा खर्च देण्यासाठी २०१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात दोन हजार कोटी रुपयांची रक्कम बाजूला काढून ठेवण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील महिलांसाठी चुलीच्या धुरात केला जाणारा स्वयपांक हा शाप ठरत असून त्यापासून मुक्तता देण्यासह वेळ वाचविण्यासाठी सवलतीत गॅस कनेक्शनची योजना आणण्यात आली आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)