उष्णतेबाबत सरकार सतर्क, मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, विशेष तयारीच्या दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 10:30 PM2023-03-06T22:30:31+5:302023-03-06T22:34:47+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मान्सूनचा अंदाज, रब्बी पिकांवर होणारा परिणाम, वैद्यकीय पायाभूत सुविधांची तयारी आणि उष्मा आणि शमन उपायांशी संबंधित आपत्ती तयारीची माहिती घेतली.

Bracing for hot summer, PM Narendra  Modi reviews preparedness at high-level meeting | उष्णतेबाबत सरकार सतर्क, मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, विशेष तयारीच्या दिल्या सूचना

उष्णतेबाबत सरकार सतर्क, मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, विशेष तयारीच्या दिल्या सूचना

googlenewsNext

नवी दिल्ली :  देशातील बहुतांश भागांत मार्च ते मे या तीन महिन्यांत उष्णेत्या लाटांचा (Heat Wave) सामना करावा लागण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने म्हणजेच 'आयएमडी'ने व्यक्त केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली सोमवारी संध्याकाळी उष्ण हवामानाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मान्सूनचा अंदाज, रब्बी पिकांवर होणारा परिणाम, वैद्यकीय पायाभूत सुविधांची तयारी आणि उष्मा आणि शमन उपायांशी संबंधित आपत्ती तयारीची माहिती घेतली.

यासंदर्भात पीएमओने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध भागधारकांसाठी विविध जागरूकता सामग्री तयार करण्यास सांगितले. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'आयएमडी'ला दैनंदिन हवामानाचा अंदाज अशा प्रकारे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत की, त्याचा अर्थ लावणे आणि प्रसारित करणे सोपे जाईल. तसेच, पंतप्रधानांनी सर्व रुग्णालयांच्या विस्तृत फायर ऑडिटच्या गरजेवर भर दिला आणि प्रतिकूल हवामानात अन्नधान्याचा इष्टतम साठा सुनिश्चित करण्यासाठी एफसीआयला तयार राहण्यास सांगितले.

पीएमओच्या म्हणण्यानुसार, अति उष्णतेचा सामना करण्यासाठी मुलांना तयार करण्यासाठी शाळांना विशेष व्याख्याने आयोजित करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, 'उष्ण हवामानासाठी काय आणि काय करू नये' हे सुलभ स्वरूपात तयार केले जावे आणि जिंगल्स, चित्रपट, पॅम्प्लेट्स इत्यादी प्रसिद्धीची विविध माध्यमे देखील तयार करून प्रसिद्ध केली जावीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. याचबरोबर, 'आयएमडी'ला दैनंदिन हवामानाचा अंदाज अशा प्रकारे जारी करण्यास सांगितले आहे की, ज्याचा सहज अर्थ लावला जाऊ शकतो आणि प्रसारित करता येईल. हवामानाचा अंदाज प्रसारित करण्यासाठी वृत्तवाहिन्या, एफएम रेडिओ इत्यादींचा समावेश करण्यावरही पंतप्रधानांनी भर दिला, जेणेकरून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेता येईल.

याचबरोबर, पंतप्रधानांनी सर्व रुग्णालयांच्या आग प्रतिबंधक उपायांचे तपशीलवार ऑडिट करण्याच्या गरजेवर भर दिला आहे.अग्निशमन विभागाकडून सर्व रुग्णालयांमध्ये मॉक फायर ड्रिल घेण्यात याव्यात, असे सांगितले आहे. याशिवाय, जंगलातील आगीचा सामना करण्यासाठी समन्वित प्रयत्नांच्या आवश्यतेवर जोर दिला आणि ती रोखण्यासाठी प्रयत्नांमध्ये पद्धतशीर बदल करण्याचे आवाहन केले. तसेच, जलाशयांमध्ये चारा आणि पाण्याच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले. दरम्यान, या बैठकीला पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, गृह सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव, भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव आणि एनडीएमएचे सदस्य सचिव उपस्थित होते.

"मार्च महिना फेब्रुवारीपेक्षा उष्ण ठरेल'
यंदाचा फेब्रुवारी महिना हा गेल्या १२२ वर्षांतला सगळ्यात उष्ण फेब्रुवारी ठरला आहे. फेब्रुवारीमध्ये सरासरी कमाल तापमान २९.५४ अंश सेल्सिअस राहिले. १९०१ नंतरचा हा उच्चांक आहे. गेल्या १२२ वर्षात यंदा पहिल्यांदाच फेब्रुवारीमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा १.७३ अंश जास्त राहिले, तर किमान तापमान सरासरीपेक्षा ०.८१ अंश जास्त राहिले. तसेच, मार्च महिना फेब्रुवारीपेक्षा उष्ण ठरेल, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. उष्णतेच्या लाटांचा सर्वाधिक फटका मध्य आणि उत्तर भारताला बसण्याची शक्यता आहे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी उष्णतेची लाट आली, तर गहू, मोहरी आणि हरभऱ्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकार अन्न महागाई कमी करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांना त्यामुळे मोठा फटका बसू शकतो.तसेच, तापमान वाढल्यामुळे विजेची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजेच्या पुरवठ्यावर ताण येऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

Web Title: Bracing for hot summer, PM Narendra  Modi reviews preparedness at high-level meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.