डॉ.आंबेडकर व मोदी ब्राह्मण, श्रीकृष्ण ओबीसी; भाजपा नेत्याची मुक्ताफळे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 03:24 PM2018-04-29T15:24:59+5:302018-04-29T15:25:13+5:30
विद्यासंपन्न ब्राह्मणांना सत्तेची हाव कधीच नव्हती. त्यांनी नेहमीच संपूर्ण समाजाचा विचार केला.
अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच वादग्रस्त वक्तव्य न करण्याचा इशारा देऊनही भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांच्या वर्तणुकीत कोणताही फरक पडलेला दिसत नाही. गुजरातमधील विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून त्याचा प्रत्यय आला. गांधीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ब्राह्मण व्यापार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राह्मण असल्याचे म्हटले. तसेच श्रीकृष्ण ओबीसी होता, संदीपन ऋषींनी त्यांना देव केले. विद्यासंपन्न ब्राह्मणांना सत्तेची हाव कधीच नव्हती. त्यामुळेच चंद्रगुप्त मौर्य, श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या यशात ब्राह्मणांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात चाणक्यही राजा होऊ शकला असता. मात्र, चाणक्याला सत्तेची हाव नव्हती. ब्राह्मणांनी नेहमीच संपूर्ण समाजाचा विचार केला, असे त्रिवेदी यांनी म्हटले. त्रिवेदींनी हे विधान केले त्यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे आता त्रिवेदींची कानउघडणी होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आणि आमदारांनी ऊठसूठ कोणत्याही विषयावर तोंड उघडून माध्यमांना मसाला पुरविण्याचे आणि परिणामी पक्षाला व सरकारला नाहक वाईटपणा आणण्याचे प्रकार बंद करावेत, असा इशारावजा सल्ला दिला होता. नको त्या विषयावर पांडित्य दाखविण्याऐवजी या मंडळींनी ज्यासाठी लोकांनी निवडून दिले आहे, ते आपले लोकसेवेचे काम करावे, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, मोदींचा हा सल्ला भाजपच्या नेत्यांनी फारसा मनावर घेतलेला दिसत नाही.