‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र तिप्पट वेगवान होणार, आवाजाच्या सातपट वेगाने मारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 05:40 AM2018-04-30T05:40:29+5:302018-04-30T05:40:29+5:30
‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र येत्या ७ ते १० वर्षात आवाजापेक्षा सातपट अधिक अर्थात ‘मॅक ७’ इतक्या वेगाने मारा करू शकणार आहे
मुंबई : ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र येत्या ७ ते १० वर्षात आवाजापेक्षा सातपट अधिक अर्थात ‘मॅक ७’ इतक्या वेगाने मारा करू शकणार आहे. सध्या ‘मॅक २.८’ वेगाने मारा करणारे हे क्षेपणास्त्र टप्प्याटप्प्याने वेग वाढवून सध्याच्या ‘सुपरसॉनिक’वरून अधिक वरच्या ‘हायपरसॉनिक’ श्रेणीत नेण्यात येईल, असे ‘ब्रह्मोस एअरोस्पेस‘ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुधीर मिश्रा यांनी सांगितले.
‘देशाच्या नवीन अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञानाचे स्थान’ या विषयावरील चर्चासत्रासाठी सुधीर मिश्रा मुंबई शेअर बाजारात आले होते. त्यावेळी त्यांनी ‘ब्रह्मोस‘बाबत माहिती दिली. ब्रह्मोस एअरोस्पेस ही भारत व रशिया यांची संयुक्त कंपनी आहे. भारतातील ब्रह्मपुत्रा व रशियातील मस्क्वा या नद्यांच्या नावांची अद्याक्षरे घेऊन या क्षेपणास्त्राचे नामकरण करण्यात आले आहे. या कंपनीमध्ये भारताच्या डीआरडीओची भागिदारी ५५ टक्के आहे.
मिश्रा यांनी सांगितले की, ब्रह्मोस क्षेपणास्त्र सध्या सुपरसॉनिक वेगाने मारा करते. लवकरच या क्षेपणास्त्राचा वेग मॅक ३.५ पर्यंत वाढवला जाईल. त्यानंतर पुढील तीन वर्षात तो मॅक ५ वर नेला जाईल. पुढील पिढीतील क्षेपणास्त्र होण्यासाठी हा वेग मॅक ७ पर्यंत वाढवणे गरजेचे असेल. त्यासाठी आम्ही १० वर्षापर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. या कालावधित हे क्षेपणास्त्र हायपरसॉनिक श्रेणीत नेले जाईल. हे लक्ष्य गाठण्यासाठी डीआरडीओसह आयआयटी व इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समधील तज्ज्ञ कार्यरत आहेत.
कुठल्याही क्षेपणास्त्राचा कालावधी हा अधिकाधिक २५ ते ३० वर्षे असतो. त्यानंतर नवीन तंत्रज्ञानामुळे ते क्षेपणास्त्र कालबाह्य ठरते. सध्याची सर्व क्षेपणास्त्रे गतीमानतेवर आधारित तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. पण पुढील काळातील क्षेपणास्त्रे उच्च क्षमतेच्या लेझर तंत्रज्ञानाने सज्ज असतील. तरीही सध्या ब्रह्मोस हे जगातील सर्वाधिक वेगवान क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेकडेही असे क्षेपणास्त्र नाही. या क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी ७० टक्के सुटे भाग खासगी कंपन्यांकडून खरेदी केले जात आहेत, असेही मिश्रा यांनी स्पष्ट केले.
चारच देशांकडे तंत्रज्ञान - आवाजाच्या दुप्पट ते तिप्पट वेगाने मारा करणारी सुपरसोनिक क्षेपणास्त्रे अनेक देशांकडे आहेत. पण आवाजापेक्षा चारपट किंवा त्याहून अधिक वेगाने मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान जगात फक्त चार देशांकडे आहे. अमेरिका या तंत्रज्ञानावर सध्या काम करीत आहे. याखेरीज दोन प्रकारची क्षेपणास्त्रे रशिया स्वतंत्रपणे विकसित करीत आहे. रशिया आणि चीन संयुक्तपणे दोन प्रकारची क्षेपणास्त्रे निर्मित करीत आहे. त्यानंतर भारत-रशिया यावर काम करीत आहे.
मारक क्षमताही वाढणार : भारत अलिकडेच क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण देशांच्या गटाच्या (एमटीसीआर) निर्बंधांतून बाहेर पडला. त्यामुळे सुपरसोनिक वेगाच्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३०० किमीच्यावर नेण्यावरील बंधनातून भारताची मुक्तता झाली आहे. यामुळेच सध्याच्या ब्रह्मोसची मारक क्षमता ४५० किमीवर नेली जात आहे. त्यानंतर हायपरसोनिक (मॅक ७) श्रेणीतील ब्रह्मोसची मारक क्षमता ७०० किमीपर्यंत राहण्याची शक्यता आहे.