आयओएची ‘ब्रँड व्हॅल्यू’ ५०० कोटी
By admin | Published: July 19, 2016 06:25 AM2016-07-19T06:25:24+5:302016-07-19T06:25:24+5:30
स्वतंत्र आणि आत्मनिर्भर बनविण्याचा निर्धार व्यक्त करून आयओएची स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू ५०० कोटी असल्याची माहिती अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी सोमवारी दिली.
नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेला (आयओए) अमेरिकेच्या आॅलिम्पिक समितीसारखेच स्वतंत्र आणि आत्मनिर्भर बनविण्याचा निर्धार व्यक्त करून आयओएची स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू ५०० कोटी असल्याची माहिती अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी सोमवारी दिली.
रिओसाठी जाणाऱ्या भारतीय आॅलिम्पिकपटूंच्या अधिकृत समारोप सोहळ्यात रामचंद्रन म्हणाले, ‘‘आयओएची ब्रँड व्हॅल्यू’ ५०० कोटी असल्याचे ऐकून मलादेखील आश्चर्य वाटले. आयओएला आता अमेरिकेच्या आॅलिम्पिक समितीसारखेच आत्मनिर्भर बनविण्याचे टार्गेट आहे. मदतीसाठी सरकारकडे वारंवार हात पसरावा लागू नये, हा आमचा हेतू आहे. आत्मनिर्भर व्हायचे झाल्यास अमेरिकेच्या आॅलिम्पिक समितीप्रमाणे समर्शियल पार्टनर शोधावे लागतील. त्यांच्याकडून आर्थिक सहकार्य घ्यावे लागेल. उत्कृष्टपणा आणायचा असेल तर काळ आणि वेळेनुसार बदलावे लागेल. आॅलिम्पिकच्या तयारीसाठी खेळाडूंना परदेशात सरावाची संधी दिल्याबद्दल मी सरकारचा आभारी आहे. आॅलिम्पिक पदक जिंकण्यासाठी सरकार व आयओएदरम्यान संपूर्ण ताळमेळ असावा, हे आता अनेकांना पटू लागले आहे. याच कारणांमुळे रिओ आॅलिम्पिकसाठी मोठ्या संख्येने खेळाडू पात्र ठरू शकले.’’
भारतीय खेळाडूंनी रिओत चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करून रामचंद्रन म्हणाले, ‘‘यंदा लंडनच्या तुलनेत अधिक पदके मिळतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही.’’ कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा सचिव राजीव यादव, आयओएचे महासचिव राजीव मेहता, कोशाध्यक्ष अनिल खन्ना, रिओसाठी जाणारे भारताचे पथकप्रमुख राकेश गुप्ता उपस्थित होते. (वृत्तसंस्था)