केदारनाथ मंदिरात सोन्याऐवजी पितळ?, १२५ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 06:27 AM2023-06-20T06:27:42+5:302023-06-20T06:28:05+5:30
सोन्याचा मुलामा देण्याच्या नावाखाली १२५ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
केदारनाथ : उत्तराखंडमधील केदारनाथ या प्रसिद्ध मंदिरातील गाभाऱ्यात सोन्याऐवजी पितळी मुलामा देण्यात आल्याचा आरोप चारधाम महापंचायतचे उपाध्यक्ष व केदारनाथ मंदिराचे पुजारी आचार्य संतोष त्रिवेदी यांनी एका व्हिडीओद्वारे केला आहे.
सोन्याचा मुलामा देण्याच्या नावाखाली १२५ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्रिवेदी यांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असे बद्री-केदार मंदिर समितीने म्हटले आहे.
या समितीने म्हटले आहे की, केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात सोन्याचा मुलामा देण्यात यावा, अशी एका भाविकाची इच्छा होती. त्यानुसार कृती करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.
पुरातत्त्व खात्याच्या देखरेखीखाली या भाविकाच्या सराफामार्फत सोन्याच्या मुलाम्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र, सोने हे धनदौलतीचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याचा मुलामा केदारनाथ मंदिरातील गाभाऱ्यात देणे योग्य होणार नाही, अशी भूमिका पुजाऱ्यांनी घेतली होती. सोन्याच्या मुलाम्याबाबत राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन आरोप केले जात असल्याचा दावा बद्री-केदार मंदिर समितीने केला आहे. (वृत्तसंस्था)
सोन्याची नीट तपासणी झाली नव्हती?
आचार्य संतोष त्रिवेदी यांनी असा दावा केला की, केदारनाथ मंदिरातील गाभाऱ्यात मुलाम्याचे काम करण्याआधी सोन्याची नीट तपासणी झाली नव्हती. त्यामुळे या प्रकरणी झालेल्या घोटाळ्याबाबत बद्री-केदार मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.
उच्चस्तरीय चौकशी हवी
केदारनाथ मंदिरातील सोन्याच्या मुलामाप्रकरणी झालेले आरोप गंभीर असून, हे फौजदारी गुन्ह्याचे प्रकरण आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.
- अखिलेश यादव,
माजी मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश