वीरप्पन आणि नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले अधिकारी 'मिशन काश्मीर'वर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 11:28 AM2018-06-21T11:28:07+5:302018-06-21T12:42:31+5:30

 जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आल्यानंतर आता राज्यातील दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना वेसण घालण्यासाठी देशातील सर्वात कणखर अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात येत आहे.

Brave Officers appointed on 'Mission Kashmir' | वीरप्पन आणि नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले अधिकारी 'मिशन काश्मीर'वर 

वीरप्पन आणि नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले अधिकारी 'मिशन काश्मीर'वर 

googlenewsNext

नवी दिल्ली -  जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आल्यानंतर आता राज्यातील दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना वेसण घालण्यासाठी देशातील सर्वात कणखर अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून छत्तीसगडचे अतिरिक्त मुख्य सचिव बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांची राज्यपालांचे मुख्य सचिव आणि वीरप्पनचा खात्मा करणाऱ्या पथकाचे नेतृत्व करणारे माजी आयपीएस अधिकारी विजय कुमार यांची राज्यपालांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
 सुब्रह्मण्यम यांची गणना देशातील आघाडीच्या अधिकाऱ्यामध्ये होते. नक्षलग्रस्त बस्तरसारख्या भागात शांतता प्रस्थापित कऱण्यासाठी त्यांनी केलेले कार्य वाखाणण्यासारखे होते. तर विजय कुमार यांनी कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन याला ऑक्टोबर 2004 साली कंठस्नान घालणाऱ्या पथकाचे नेतृत्व केले होते. 

 डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातही सुब्रह्मण्यम यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मनमोहन सिंह यांनी आपल्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान सुब्रह्मण्यम यांचा आपले स्वीय सचिव नियुक्त केले होते. तसेच मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांची संयुक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. मोदी सरकारच्या काळातही सुब्रह्मण्यम यांच्याकडे संयुक्त सचिवपद सोपवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचि छत्तीसगडमध्ये प्रतिनियुक्ती झाली होती. छत्तीसगडचे गृहसचिव म्हणून काम करताना त्यांनी नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय काम केले. त्यांच्या दृढ इच्छाशक्तीमुळेच नक्षलग्रस्त बस्तर भागात 700 किमीचा रस्ता बनवणे शक्य झाले. तसेच 2017 साली या भागात 300 नक्षलवादी मारले गेले, तर 100 हून अधिक नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण केले. 

तर राज्यपालांचे सल्लागार म्हणनू नियुक्त करण्यात आलेले माजी आयपीएस अधिकारी विजय कुमार यांना जंगली परिसरात अभियान राबवण्याचा अनुभव आहे,. तामिळनाडू कॅडरच्या 1975च्या बॅचचे अधिकारी असलेल्या कुमार यांनी 1998 ते 2001 या काळात बीएसएफचे महानिरीक्षक म्हणून काश्मीर खोऱ्यात काम पाहिले आहे. त्यावेळी दहशतवाद विरोधी अभियानामध्ये बीएसएफ अधिक सक्रीय होते. 2010 साली छत्तीसगडमधील दांतेवाडा येथे नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 75 जवानांना वीरमरण आल्यानंतर कुमार यांना या दलाचे प्रमुख बनवण्यात आले होते. तसेच वीरप्पनला कंठस्नान घालणाऱ्या पथकाचेही त्यांनी नेतृत्व केले होते.  
 

Web Title: Brave Officers appointed on 'Mission Kashmir'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.