4 फोनसह सर्व पुरावे नष्ट करून मास्टरमाइंड ललितने केलं सरेंडर; संसदेतील घुसखोरीमागे मोठा कट?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 09:01 AM2023-12-15T09:01:38+5:302023-12-15T09:51:54+5:30
संसदेच्या आत जाऊन निदर्शने करणाऱ्या चारही लोकांचे मोबाईल घेऊन ललित झा पळून गेला होता.
संसदेतील घुसखोरीचा संपूर्ण कट रचणारा मास्टरमाइंड ललित झा याने दिल्ली पोलीस ठाण्यात सरेंडर केलं आहे. संसदेच्या आत जाऊन निदर्शने करणाऱ्या चारही लोकांचे मोबाईल घेऊन ललित झा पळून गेला होता. तपासात देखील हेच समोर आलं आहे, मात्र आता त्याच्या सरेंडरनंतर पोलिसांना ललित आणि महेशकडे एकही मोबाईल सापडला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानहून दिल्लीत येऊन सरेंडर करण्यापूर्वी ललितने तेथेच चारही मोबाईल नष्ट केले. दिल्लीतून पळून गेल्यानंतर ललित कुचामन येथे गेला होता, जिथे तो त्याचा मित्र महेशला भेटला. महेशनेच ललितला रात्री राहण्यासाठी एक खोली मिळवून दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संसद भवनात घडलेल्या घटनेनंतर ललितने गुरुवारी सकाळीच सर्व फोन नष्ट केले होते. मात्र, पोलिसांचा ललितच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास नाही आणि ते याचा तपास करत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
संसदेत दोन आरोपींनी स्मॉग कॅनचा वापर केला होता, तर बाहेरही दोन लोकांनी स्मॉग कॅनमधून रंगीत धूर मारत घोषणाबाजी केली. पोलीस आता कोणत्याही परिस्थितीत चार आरोपींचे फोन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. स्पेशल सेलची टीम आज महेश आणि ललितला कोर्टात हजर करून रिमांड मागणार आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
तपासात अडथळे आणण्यासाठी ललित खोटं बोलत असल्याचा पोलिसांना संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी महेशच्या चुलत भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होतं. त्याचवेळी महेश आणि ललित सरेंडर करण्यासाठी दिल्लीत येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली.
संसदेत जाण्यापूर्वी आणि आंदोलन करण्यापूर्वी मनोरंजन, सागर, नीलम आणि अमोल यांनी ललित झा याच्याकडे फोन ठेवला होता. ललित झा बाहेरच्या गर्दीत सामील होऊन त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. पोलिसांनी चार आरोपींना पकडताच ललित झा सर्वांचे मोबाईल घेऊन तेथून पळून गेला.