दलितांवरील हल्ले कठोरपणे मोडून काढा!
By Admin | Published: August 15, 2016 06:29 AM2016-08-15T06:29:44+5:302016-08-15T06:29:44+5:30
दलित आणि अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अशा घटना अतिशय कठोरपणे मोडून काढल्या पाहिजेत, असे म्हटले
नवी दिल्ली : दलित आणि अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अशा घटना अतिशय कठोरपणे मोडून काढल्या पाहिजेत, असे म्हटले. कमकुवत घटकांविरुद्ध होत असलेला हिंसाचार हा देशाची संस्कृती आणि नीतिमूल्यांपासून आपण भरकटत चालल्याचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले.
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त मुखर्जी यांनी रविवारी सायंकाळी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात असहिष्णू तत्त्वांवर कठोरपणे हल्ला केला. ते म्हणाले, ‘फूट पाडणारा राजकीय कार्यक्रम आणि गट आणि वैयक्तिक पातळीवर चर्चांच्या होणाऱ्या ध्रुवीकरणामुळे संस्थात्मक विडंबन आणि घटनात्मक नाश होण्यास हातभार लागतो.’ ठरावीक कालावधीनंतर सरकारची निवड करणे म्हणजेच काही लोकशाही नाही, असेही त्यांनी नमूद केले. भारताची पुरातन नीतिमूल्ये राज्यातील सत्तांनी आपल्यावरील जबाबदाऱ्या पार पाडताना नीतिमूल्यांपासून भरकटत चालल्याचे लक्षण असून अशा शक्तींना कठोरपणे मोडून काढले पाहिजे, असे मुखर्जी म्हणाले.
मुखर्जी म्हणाले, ‘‘आपल्या समाजाच्या सामुहिक शहाणपणाने मला अशा शक्ती वर येणार नाहीत व देशाच्या उल्लेखनीय वाढीचा प्रवास कोणत्याही अडथळ््याविना सुरू राहील असा आत्मविश्वास दिला आहे.’’ स्वातंत्र्याच्या महान वृक्षाला लोकशाही संस्थांच्या पोषणाची सतत गरज असते. फूट पाडणे, अडथळे आणणे आणि गट आणि वैयक्तिक पातळीवर फाटाफूट निर्माण करणाऱ्या राजकीय उद्देशाची सतत अमलबजावणी करणे यातून संस्थांचे विडंबन आणि घटनात्मक नाश याशिवाय दुसरे काहीही हाती लागत नाही, असे प्रणव मुखर्जी म्हणाले. घटनेने सरकारच्या कोणत्या अंगाची काय जबाबदारी व कर्तव्ये आहेत हे स्पष्ट केले आहे. आपापले कर्तव्य पार पाडताना मर्यादांचे उल्लंघन होणार नाही हे पदाधिकाऱ्यांनी बघायचे असते, असे त्यांनी सांगितले. सगळे भारतीय विकसित होतील तेव्हाचे भारताचाही विकास होईल. कधीकाळी विकास प्रक्रियेतून वगळले गेलेल्यांना आता समाविष्ट करून घ्यावे लागेल. जे दुखावले गेले त्यांना देशाच्या मध्यप्रवाहात आणले गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्य मिळाले तेव्हा कोणालाही भारतात लोकशाही देश म्हणून टिकून राहील, असे वाटले नव्हेत. आपापल्या विविधतेसह १२५ कोटी लोकांनी ही भिती फोल ठरविल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मुखर्जी यांनी केला.
आमची घटना ही काही केवळ राजकीय किंवा कायद्याचा दस्तावेज नाही तर ती भावनात्मक, सांस्कृतिक आणि सामाजिक नात्याचाही दस्तावेज आहे. आजच्या यंत्रयुगात टिकून राहण्यासाठी ज्ञान, कौशल्य आणि नवे काही तरी शोधणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. सलग दोन दुष्काळानंतरही चलनवाढ सहा टक्क्यांच्या खालीच राहिली आणि कृषी उत्पादन स्थिर राहिल्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केला.
भारताची अर्थव्यवस्था ही वेगाने वाढणारी असल्याची पावती आंतरराष्ट्रीय संस्थांनी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)