माफियांचे कंबरडे मोडा, आरटीओतील दलाली रोखा; युपीत योगी आदित्यनाथ ‘इन ॲक्शन मोड’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 06:00 AM2022-05-23T06:00:44+5:302022-05-23T06:01:15+5:30
काेणत्याही परिस्थितीत माफियांचे कंबरडे माेडा, अशा थेट सूचना योगी आदित्यनाथ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ ॲक्शन माेडमध्ये आले असून, त्यांनी अवैध वाहतूक, आरटीओमधील दलाली, रस्त्यांवरील स्टंटबाजी राेखण्यासाठी कडक सूचना दिल्या आहेत. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात ते काेणत्याही परिस्थितीत माफियांचे कंबरडे माेडा, अशा थेट सूचना अधिकाऱ्यांना देताना दिसत आहेत.
उत्तर प्रदेशात अवैध बांधकामांवर बुलडाेझर चालवून धडक कारवाई केल्यामुळे याेगी आदित्यनाथ चर्चेत आले. आता ते अधिकाऱ्यांना माफियांचे कंबरडे माेडा आणि रस्त्यांवर काेणत्याही अवैध कारवाया चालू देऊ नका, अशा धडक सूचना देताना दिसत आहेत. या सूचना देताना याेगींनी जनतेच्या हृदयालाच हात घातला आहे. याेगी म्हणाले, की २४ तासांमध्ये अवैध स्टॅंड हटवा. एक जरी माफिया जाेडला गेला तर त्याची गॅंग पुन्हा तयार हाेईल. त्याची आर्थिक स्थिती मजबूत झाली तर ताे तुमचे जगणे कठीण करील. म्हणून त्याच्या आर्थिक नाड्या आवळायला हव्यात. अवैध स्टॅंड आणि डग्गामार बस सुरू आहेत. हे थांबवायला हवे. त्यात माफिया हावी आहेत.
ओव्हरलाेड वाहने नकाे
रस्त्यांवर ओव्हरलाेड झालेली वाहने दिसायला नकाेत. त्यामुळे रस्ते खराब हाेतात. जिथे ओव्हरलाेडिंग हाेते, तीच केंद्रे उद्ध्वस्त करायला हवी.
रस्त्यांवर पार्किंग नको
रस्त्याच्या कडेला काेणतेही वाहन उभे राहणार नाही. ते अपघातासाठी कारणीभूत ठरतात. त्यांच्यासाठी पार्किंगची जागा द्या. ढाब्यांबाहेर ट्रक उभे राहतात. तेथे पार्किंगची जागा नसल्यास अवैध ढाबेदेखील हटवा.
स्टंटबाजी राेखा
ओव्हर ब्रिज किंवा फ्लायओव्हरवर तरुण स्टंट करताना दिसतात. ते काेणत्याही परिस्थितीत राेखायला हवे. हेल्मेटचा वापर अनिवार्य करण्याची गरज आहे. जनजागृती करा.
दलालांपासून मुक्ती
आरटीओ कार्यालयांना दलालांपासून मुक्त करायला हवे. ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन द्या; पण ताे त्या लायकीचा आहे की नाही, हे तपासा.
‘ते’ स्पीडब्रेकर नकाे
रस्त्यांवरील स्पीड ब्रेकर कंबर ताेडणारे नकाेत. ते कुठेच दिसायला नकाे. लवकरात लवकर ते हटवा. रुग्ण, गर्भवती महिलांना त्याचा त्रास हाेताे. टेबलटाॅप स्पीड ब्रेकर बनायला हवेत. (वृत्तसंस्था)