खाकी वर्दीतील माणुसकी; अपंग भिकाऱ्याला बसवून दिला कृत्रिम पाय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 02:33 PM2018-02-20T14:33:36+5:302018-02-20T14:34:59+5:30
मेहबुबनगर येथे राहणारा जी.वेंकटेश हा भिकारी या उपक्रमाचा पहिला लाभार्थी ठरला आहे.
हैदराबाद: रस्त्यावर किंवा रेल्वे स्थानकांवर राहणाऱ्या भिकाऱ्यांना पोलिसांकडून त्रास देण्यात आल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. त्यामुळे रस्त्यावर राहणाऱ्या या लोकांमध्ये बऱ्याचदा पोलिसांविषयी भीती किंवा तिरस्काराची भावना असते. मात्र, हैदराबादमध्ये घडलेल्या एक घटनेमुळे लोकांना खाकी वर्दीतील माणुसकीचा प्रत्यय येत आहे. येथील तुरुंग विभागाकडून रस्त्यावरील भिकाऱ्यांना कृत्रिम जयपूर फूट बसवून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मेहबुबनगर येथे राहणारा जी.वेंकटेश हा भिकारी या उपक्रमाचा पहिला लाभार्थी ठरला आहे. त्यामुळे वेंकटेशचे आयुष्य कमालीचे बदलले आहे. वेंकटेशने काही वर्षांपूर्वी एका अपघातात आपला डाव पाय गमावला होता. मात्र, आता कृत्रिम पाय बसवल्यामुळे त्याला धावण्याव्यतिरिक्त सर्व गोष्टी स्व:तहून करता येतात. यापूर्वी त्याला याच गोष्टींसाठी इतरांची मदत घ्यावी लागायची, असे वेंकटेशने सांगितले.
तुरुंग विभागाने एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने हा उपक्रम सुरू केला आहे. ही संस्था अपंग व्यक्तींना मदत करण्याचे काम करते. भिकाऱ्यांना फक्त कृत्रिम अवयव पुरवण्याइतपतच ही मदत मर्यादित नसून त्यांना इतर सुविधाही पुरवण्याचा आमचा मानस असल्याचे संस्थेने पोलिसांना सांगितले आहे. या उपक्रमामुळे हैदराबादमधील भिकाऱ्यांचे जीवन काही प्रमाणात सुसह्य झाले आहे.