ब्रेकिंग: विधानसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर होणार; निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 08:35 AM2019-09-21T08:35:17+5:302019-09-21T08:35:46+5:30
Vidhan Sabha Elections 2019 Dates Announcement : मागील निवडणुकांच्या वेळी 12 सप्टेंबर रोजी तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी निवडणुकांच्या तारखा घोषित न झाल्याने सगळ्यांच्या नजरा निवडणूक आयोगाकडे लागून राहिल्या होत्या.
नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. आज दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.
मागील निवडणुकांच्या वेळी 12 सप्टेंबर रोजी तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी निवडणुकांच्या तारखा घोषित न झाल्याने सगळ्यांच्या नजरा निवडणूक आयोगाकडे लागून राहिल्या होत्या. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. नेमकं या निवडणुकीतील मतदान दिवाळीपूर्वी होतील का दिवाळीनंतर होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Election Commission of India to hold a press conference at 12 noon today. pic.twitter.com/s2vNNXv7iD
— ANI (@ANI) September 21, 2019
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रचाराला वेग आला आहे. शिवसेना-भाजपा युती काही दिवसांत घोषित होईल तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. आघाडीत प्रत्येकी 125 जागा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहेत. तर उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडणार आहे. शिवसेना-भाजपा युतीमध्ये जागावाटपाबाबत एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेला 120 जागा सोडाव्यात असा प्रस्ताव भाजपाचा होता मात्र हा प्रस्ताव शिवसेनेने अमान्य केला असल्याने आणखी काही जागा वाढवून देण्याची भाजपाने तयारी दर्शविली आहे.
निवडणुका घोषित झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू होईल. मात्र आचारसंहितेपूर्वीच भाजपा-शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून राज्यभरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात महाजनादेश यात्रा, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रा आणि राष्ट्रवादीकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.
राज्यातील विधानसभा निवडणुका साधारणपणे 20-25 ऑक्टोबरच्या दरम्यान पार पडतील. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव झाल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल असं बोललं जात होतं. मात्र आठवडा झाला तरी विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. शुक्रवारी दिल्ली येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. त्यामुळे आज होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.