वड्रांविरुद्ध भाजपचा लोकसभेत हक्कभंग
By admin | Published: July 24, 2015 12:32 AM2015-07-24T00:32:56+5:302015-07-24T00:32:56+5:30
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याविरुद्ध भाजपने गुरुवारी लोकसभेत हक्कभंगाची नोटीस आणत अधिवेशनात सुरू
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याविरुद्ध भाजपने गुरुवारी लोकसभेत हक्कभंगाची नोटीस आणत अधिवेशनात सुरू असलेले युद्ध नव्या वळणावर नेऊन ठेवले. वड्रा यांनी मंगळवारी फेसबुक पोस्टवर असंसदीय शब्दाचा वापर केल्याचा मुद्दा लोकसभेत भाजपच्या सदस्यांनी उपस्थित करताच काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार विरोध केल्याने चांगलाच गदारोळ झाला.
वड्रा यांच्या फेसबुकवरील पोस्टचा मुद्दा संसदेच्या हक्कभंग समितीकडे सोपविला जावा आणि त्यांना सभागृहात हजर केले जावे, अशी मागणी भाजपचे खासदार अर्जुन राम मेघवाल यांनी मुद्दा उपस्थित करताना केली. काँग्रेसच्या खासदारांनी सुषमा स्वराज, शिवराजसिंह चौहान आणि वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत हौद्यात धाव घेतली. वड्रा यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस आणण्याला त्यांनी विरोध केला. अध्यक्ष महाजन यांनी या प्रकरणी लक्ष घालणार असल्याचे सांगत हा मुद्दा लोकसभेच्या हक्कभंग समितीकडे सोपविला. त्यानंतर हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांचे अॅपलगेट, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांचे स्टिंग आॅपरेशन, आसाम आणि गोव्याचे मुख्यमंत्रीद्वय अनुक्रमे तरुण गोगई आणि कामत यांच्यावर लाचखोरीचा आरोप करीत भाजपाने काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य बनविले. दरम्यान, उत्तराखंडमधील स्टिंगच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
काय म्हणाले वड्रा
संसद सुरू होताच लक्ष विचलित करण्याच्या क्षुद्र राजकीय क्लृप्त्या सुरू झाल्या आहेत. भारतातील लोक मूर्ख नाहीत, असे वड्रा यांनी मंगळवारी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले होते.