Breaking News: ब्रेकिंग न्यूज! राजीव गांधीचा मारेकरी पेरारिवलन तुरुंगातून सुटणार; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 11:24 AM2022-05-18T11:24:44+5:302022-05-18T11:39:30+5:30
Rajiv Gandhi Latest News: राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी सात आरोपींना दोषी ठरविण्यात आले होते. न्यायालयाने सर्व दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, 2014 साली सर्वोच्च न्यायालयाने ती जन्मठेपेत बदलली होती.
माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दोषींपैकी एक आरोपी एजी पेरारिवलन याची सुटका करण्याचे आदेश दिले.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नलिनी श्रीहरन, मरुगन, एक श्रीलंकन नागरिकासहित अन्य ६ आरोपींच्या सुटकेचा मार्गदेखील मोकळा होण्याची शक्यता आहे. राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी सात आरोपींना दोषी ठरविण्यात आले होते. न्यायालयाने सर्व दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, 2014 साली सर्वोच्च न्यायालयाने ती जन्मठेपेत बदलली होती.
आता यापैकी एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा पूर्ण झाल्याने सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे अन्य सहा जणांच्या देखील सुटकेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पेरारिवलन गेल्या ३१ वर्षांपासून तुरुंगात आहे. पेरारिवलन याने त्याच्या सुटकेला झालेल्या विलंबाबाबत सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. 2018 मध्ये तामिळनाडू सरकारने त्याच्या सुटकेची शिफारस केली होती. यानंतर हे प्रकरण कायदेशीर कचाट्यात अडकले होते.
21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदुर येथे एका जाहीर सभेदरम्यान हत्या करण्यात आली होती. यानंतर 11 जून 1991 रोजी पेरारिवलनला अटक करण्यात आली. त्याने आरोपींना वयाच्या १९ व्या वर्षी सेल विकत घेऊन दिले होते, असा आरोप होता.