Breaking : ससूनला 'कोव्हिशिल्ड'च्या मानवी चाचणीसाठी मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 08:55 PM2020-08-26T20:55:40+5:302020-08-26T21:00:32+5:30
'कोव्हिशिल्ड' लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयाला मान्यता Breaking : ससूनला 'कोव्हिशिल्ड'च्या मानवी चाचणीसाठी मान्यता
पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक लसीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठात विकसित झालेल्या आणि सिरम इन्स्टिट्यूटतर्फे उत्पादित करण्यात येत असलेल्या ' कोव्हिशिल्ड' लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयाला मान्यता मिळाली आहे. पुढील आठवड्यात प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात होणार आहे.
कोव्हिशिल्ड लसीची देशातील पहिली मानवी चाचणी बुधवारी भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे पार पडली. दोन स्वयंसेवकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. देशातील १७ विविध ठिकाणी लसीची चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये ससून रुग्णालयाचाही समावेश आहे. बुधवारी रुग्णालयाला अधिकृत मान्यता मिळाली. एका आठवड्यात सिरम इन्स्टिट्यूटकडून लसीचे डोस प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष मानवी चाचणीला सुरुवात होणार आहे. यासाठी ३०० स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यातील निवडक निरोगी स्वयंसेवकांच्या आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या करण्यात येतील, अशी माहिती ससून रुग्णालयाच्या प्रशासनाकडून देण्यात आली.
सिरम इन्स्टिट्यूटतर्फे लसींच्या उत्पादनासाठी अॅस्ट्राझेनेका या ब्रिटिश-स्विडिश कंपनीशी करार करण्यात आला आहे. आॅक्सफर्ड विद्यापीठातर्फे लस विकसित करण्यात येणार आहे. कोव्हिशिल्ड या लसीची सुरक्षितता, क्षमता यांची चाचणी केली जाणार आहे. ‘केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेतर्फे (सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल आॅर्गनायझेशन) सर्व मान्यता मिळाल्या आहेत. संस्थेकडून ३ आॅगस्ट रोजी दुस-या आणि तिस-या टप्प्प्यातील चाचण्यांना मान्यता देण्यात आली.