Breaking : 'कोव्हिशिल्ड' लसीच्या भारतातील चाचण्या सुरुच राहणार; आदर पुनावाला यांची 'ट्विट' द्वारे माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 06:24 PM2020-09-09T18:24:11+5:302020-09-09T18:44:37+5:30
भारतात आतापर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये कोणत्याही स्वयंसेवकामध्ये विपरित परिणाम दिसलेले नाहीत.
पुणे : ऑक्सफर्ड विद्यापीठात विकसित झालेल्या लसीच्या जगभरात मानवी चाचण्या सुरु आहेत. युकेमधील एका व्यक्तीमध्ये लसीच्या मानवी चाचणीनंतर विपरित परिणाम दिसून आले. त्यामुळे तेथील चाचण्या स्थगित करण्यात आल्या आहेत. अमेरिकेनेही चाचण्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भारतातील लसीच्या मानवी चाचण्या सुरुच राहतील अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी व्टिटद्वारे दिली.
अॅस्ट्रझेनेकाने युकेमधील मानवी चाचण्या थांबवल्या आहेत, याबाबत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणतीही टिपण्णी करु शकत नाही. आतापर्यंतच्या चाचण्यांचे पुनरावलोकन करुन लवकरच सुरुवात केली जाईल, अशी अपेक्षा आहे. भारतात आतापर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये कोणत्याही स्वयंसेवकामध्ये विपरित परिणाम दिसलेले नाहीत, असेही पुनावाला यांनी स्पष्ट केले.
-------------
भारती आणि केईएममधील चाचण्या सुरळीत
भारती हॉस्पिटलमध्ये २६ ऑगस्ट रोजी तर केईएम हॉस्पिटलमध्ये २७ ऑगस्ट रोजी कोव्हिशिल्ड लसीच्या मानवी चाचण्यांना सुरुवात झाली. दोन्ही ठिकाणी चाचण्यांमधील स्वयंसेवकांमध्ये कोणतेही विपरित परिणाम दिसलेले नाहीत, असे सुत्रांकडून सांगण्यात आले. भारती हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ३४ जणांवर चाचण्या झाल्या आहे
.....
ऑक्सफोर्ड विद्यापीठात कोरोना व्हायरस लसीची चाचणी थांबविण्याची ही दुसरी वेळ
अॅस्ट्रॅजेनेका(AstraZeneca) आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस(Oxford covid-19 Vaccine)च्या मानवी चाचणीत सामील असलेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याचा प्रयोग थांबवण्यात आला आहे. अॅस्ट्रॅजेनेका यांनी एक निवेदन जारी केले आहे की, चाचणीत एक नियमित व्यत्यय आलं आहे, कारण चाचणीत सामील झालेल्या व्यक्तीच्या आजाराबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही.
या लसीला AZD 1222 असे नाव देण्यात आले. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन(WHO)च्या मते, जगातील इतर लसींच्या चाचण्यांच्या तुलनेत हे आघाडीवर होते. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष लागून आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मार्केटमध्ये पहिले स्थान मिळवेल, अशी आशा आहे. तसेच तज्ज्ञांचेही मत आहे.
AFPच्या वृत्तानुसार, सध्या सुरू असलेले ट्रायल जगभर थांबविण्यात आले आहे आणि आता स्वतंत्र तपासणीनंतरच ते पुन्हा सुरू होऊ शकते. लस चाचणीच्या तिस-या टप्प्यात हजारो लोक सामील आहेत आणि बर्याचदा यासाठी अनेक वर्षे लागतात. कोरोना लसीच्या तिसर्या टप्प्यातील चाचणीमध्ये जवळजवळ 30,000 लोकांचा समावेश आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, "मोठ्या चाचणीत आजारी पडण्याची सर्व शक्यता आहे, परंतु काळजीपूर्वक तपासणी करण्यासाठी स्वतंत्र तपासणी करणे फार महत्त्वाचे आहे." ऑक्सफोर्ड विद्यापीठात कोरोना व्हायरस लसीची चाचणी थांबविण्याची ही दुसरी वेळ आहे.