लाच प्रकरणातील नोकरशहांना कवच?
By admin | Published: May 4, 2015 01:35 AM2015-05-04T01:35:34+5:302015-05-04T01:35:34+5:30
लाचप्रकरणात अडकलेल्या नोकरशहांना सेवानिवृत्तीनंतर खटल्यापासून मुक्ती देणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीची कायदेतज्ज्ञ निंदा करीत आहेत.
नवी दिल्ली : लाचप्रकरणात अडकलेल्या नोकरशहांना सेवानिवृत्तीनंतर खटल्यापासून मुक्ती देणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीची कायदेतज्ज्ञ निंदा करीत आहेत.
प्रस्तावित दुरुस्तीने ‘धोरणात्मक लकव्या’वर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल,असे नोकरशहांना वाटत आहे. परंतु योग्य प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय फौजदारी कारवाईपासून त्यांना सवलत देण्यावर कायदेतज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सेंट्रल आयएएस असोसिएशनचे सचिव संजय भूसरेड्डी यांनी ‘धोरणात्मक लकवा’ मुक्त होण्यासाठी अशाप्रकारचे पाऊल उचलणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एस.एन. ढिंगरा आणि आर.एस. सोढी यांच्यासारखे सेवानिवृत्त न्यायाधीश आणि ज्येष्ठ वकील अनिल दिवाण यांनी सेवानिवृत्तीनंतरही नोकरशहांना वाचविण्यावर आक्षेप घेतला आहे. संपूर्ण प्रस्तावच योग्य दिशेने वाटचाल करणारा वाटत नाही,अशी टीका त्यांनी व्यक्त केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)