BRICS परिषदेसाठी PM मोदी द.आफ्रिकेला जाणार; भारतासाठी का महत्वाचा आहे हा दौरा? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 09:48 PM2023-08-21T21:48:31+5:302023-08-21T21:49:01+5:30
PM Modi BRICS Summit 2023: पीएम नरेंद्र मोदींसह चीन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष यात सामील होणार आहेत.
Narendra Modi BRICS Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहतील. यासाठी 22 ऑगस्ट रोजी सकाळी पंतप्रधान मोदींचे विमान द. आफ्रिकेच्या दिशेने उड्डाण घेईल.
22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.15 वाजता ते दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे पोहोचतील. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता पंतप्रधान मोदी ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्स डायलॉगमध्ये सहभागी होतील. यानंतर रात्री 9.30 वाजता ब्रिक्स लीडर्स रिट्रीटमध्येही ते उपस्थित राहणार आहेत. ही बंद दाराआड होणारी बैठक आहे.
असा आहे पीएम मोदींचा कार्यक्रम
PM मोदी 23 ऑगस्ट रोजी ब्रिक्स परिषदेत सहभागी होतील. ही परिषद 2 सत्रात होणार आहे. 24 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी ब्रिक्स आफ्रिका आउटरीच कार्यक्रमात सामील होतील. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेतील काही नेत्यांशी द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत. ब्रिक्स परिषद भारतासाठी महत्वाची असणार आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष सामील होणार
ब्रिक्स परिषद महत्त्वाची आहे, कारण चीनचे अध्यक्ष शी जिनपिंगही त्यात येणार आहेत. याशिवाय, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन व्हर्च्युअली हजेरी लावतील. त्यांच्या वतीने रशियाकडून परराष्ट्र मंत्री या बैठकीत सहभागी होतील. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्षही दक्षिण आफ्रिकेत उपस्थित राहणार आहेत.
काय आहे ब्रिक्स?
BRICS हा पाच देशांचा एक समूह आहे. यात जगातील 5 वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका, असे पाच देश आहेत. ब्रिक्स देशांची लोकसंख्या जगाच्या सुमारे 42% आहे. हे 30 टक्के क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात. यासह, ब्रिक्स देश जगाच्या जीडीपीमध्ये 23% योगदान देतात.
ब्रिक्सची सुरुवात कधी झाली?
BRIC ची औपचारिक स्थापना 16 जून 2009 रोजी झाली आणि 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका या गटात सामील झाल्यानंतर त्याचे नाव BRICS असे ठेवण्यात आले. सौदी अरेबिया, यूएई, इराण, इजिप्त आणि अर्जेंटिना यांच्यासह 30 हून अधिक देशांना ब्रिक्समध्ये सामील व्हायचे आहे.
द. आफ्रिकेनंतर ग्रीसला जाणार
दक्षिण आफ्रिकेतून पंतप्रधान मोदी ग्रीसच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. ग्रीसच्या पंतप्रधानांनी पीएम मोदींना आमंत्रित केले आहे. गेल्या 40 वर्षांत भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच ग्रीस भेट असेल. 25 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींचे ग्रीसमध्ये औपचारिक स्वागत होईल. ग्रीसच्या पंतप्रधानांशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा होणार आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी ग्रीसमध्ये भारतीय वंशाच्या लोकांनाही संबोधित करतील.