सिनेस्टाइल थरार, बाइकवरून प्रियकराने फेकली वरमाळा थेट नवरीच्या गळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 01:25 PM2018-04-23T13:25:55+5:302018-04-23T13:25:55+5:30
24 वर्षीय तरुणीचं लग्न होतं. ते लग्न थांबविण्यासाठी तिचा प्रियकर बाइकवरून आला होता.
पाटणा- प्रेयसीचं लग्न दुसऱ्याच कोणाशी असताना ते लग्न थांबविण्यासाठी आलेला प्रियकर व त्यावरून होणाऱ्या पुढील गोष्टी आपण नेहमीच सिनेमात बघतो. सिनेमात या गोष्टी घडतात तेव्हा बघताना चांगल्या वाटतात. पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात असं काही घडेल याचा आपण विचारही करत नाही. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.
india Times ने दिलेल्या वृत्तानुसार, एका 24 वर्षीय तरुणीचं लग्न होतं. ते लग्न थांबविण्यासाठी तिचा प्रियकर बाइकवरून आला होता. मंडपात नवरी-नवरदेव बसलेले असताना बाइकवरून आलेल्या तिच्या प्रियकराने बाइकवरूनच वरमाळा प्रेयसीकडे भिरकावली. विशेष म्हणजे ती फुलांची माळ बरोबर तिच्याच गळ्यात पडली. प्रियकराने गळ्यात वरमाळा टाकल्यावर मंडपात असलेल्या वधुने म्हणजेच त्या मुलाच्या प्रेयसीनेही त्याला वरमाळा घातली. दिग्दर्शक करण जोहर किंवा यश चोप्रा यांच्या सिनेमात दिसावी अशी घटना बिजनोरमधील नगीनामध्ये घडली. दोघांनी एकमेकांना वरमाळा घातल्याने चिडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाला चांगलाच चोप दिला. पण नंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मुलाला वाचविलं.
या घटनेनंतर तरुणीचं ज्या मुलाशी लग्न जमलं होतं त्याच्या कुटुंबीयांनी लग्न मोडलं व रागात तेथून निघून गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, तरूणी व तिचा प्रियकर कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. त्यांच्या प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध होता. विविध जातीचे असल्याने घरच्यांनी त्यांच्या नात्याला कडाडून विरोध केला.