पंतप्रधान मोदींचं नाव विसरला, होणाऱ्या नवरीनं मोडलं लग्न अन् दीरासोबतच थाटला संसार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 05:26 PM2023-06-19T17:26:23+5:302023-06-19T17:26:47+5:30
उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.
गाझीपूर : उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे नवरदेवाला पंतप्रधानांचे नाव सांगता न आल्याने नवरीने लग्नास नकार दिल्याची घटना घडली. सैदपूर पोलीस स्टेशन परिसरातील नसीरपूर गावातील रहिवासी राम अवतार राम यांचा मुलगा शिवशंकरचे (२७) लग्न शेजारील गावातील रहिवासी लाखेडू राम यांची मुलगी रंजना हिच्यासोबत ठरले होते. पण मेव्हणीने लग्नाच्या दिवशी सकाळी नवरदेवाला देशाच्या पंतप्रधानांचे नाव विचारले असता मुलाला ते सांगता आले नाही.
दरम्यान, मेव्हणीसह नवरीच्या मैत्रीणींनी आणखीही काही प्रश्न विचारले. पण नवऱ्या मुलाला एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. यानंतर संतापलेल्या नवरी मुलीने होणारा नवरा मंद असल्याचे समजून लग्नास नकार दिला. नंतर घरातल्यांच्या दबावानंतर नवरदेवाच्या लहान भावासोबत लग्न लावून देण्यात आले. लग्न लागल्यानंतर नवरी सासरला गेली. पण काही दिवसांनी मुलीला आणण्यासाठी मुलीचे नातेवाईक तिच्या घरी पोहोचले असता प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
कमी वयाच्या मुलासोबत लग्न लावले - नवरदेवाचे वडील
नवरदेवाच्या वडिलांनी आरोप करताना म्हटले की, मुलीकडील मंडळीने माझा मोठा मुलगा शिवशंकर हा मंद असल्याचे कारण देत छोटा मुलगा अनंतसोबत लग्न लावून दिले. अनंतचे वय लग्नासाठी अद्याप कमी आहे. याप्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार मिळाली नव्हती. पण मुलीच्या तक्रारीवरून मुलाला पोलीस ठाण्यात आणले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांनी आपापसात बोलून प्रकरण मिटवले आणि मुलाला सोडण्यात आले.