Coronavirus: १२ दिवसांचा संसार, लग्नाच्या जोड्यातच वधुवर अंत्यसंस्कार; नवरा देतोय जीवन-मृत्यूची झुंज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 07:38 PM2021-05-13T19:38:52+5:302021-05-13T19:39:50+5:30
ज्या घरात आनंदी वातावरण होतं तिथेच दु:ख पसरलं. यूपीच्या लखीमपूर येथे कोरोनानं नुकतेच लग्न झालेल्या दाम्पत्यावर संकट कोसळलं
लखीमपूर - कोरोना काळात अनेकांनी स्वत:च्या जवळची माणसं गमावली. दुसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार माजला आहे. हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. एक अशीच घटना आम्ही तुम्हाला सांगतोय जी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. एक नव दाम्पत्य..ज्यांचा संसार फुललाही नव्हता तेवढ्यात कोरोना काळ म्हणून त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. अवघ्या १२ दिवसांत या दाम्पत्याचा संसार अर्ध्यावरच मोडला.
ज्या घरात आनंदी वातावरण होतं तिथेच दु:ख पसरलं. यूपीच्या लखीमपूर येथे कोरोनानं नुकतेच लग्न झालेल्या दाम्पत्यावर संकट कोसळलं आहे. ३० एप्रिल रोजी शोभित आणि रुबी यांचे लग्न झाले. परंतु लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा आणि बायको दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. रुबीला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. जिथं १२ व्या दिवशी तिने जीव सोडला. लग्नाच्या जोड्यातच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर नवऱ्याची अवस्था अद्यापही गंभीर आहे.
१० दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या रूबीचं ईशवारा गावातील महेंद्र कटियार यांचा मुलगा शोभितसोबत ३० एप्रिल रोजी वाजत गाजत लग्न झालं. १ मे रोजी शोभितने रूबीला घरी आणलं. सासरी पोहचल्यानंतर रूबीला अतिताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर शोभित आणि त्याच्या घरच्यांनी रूबीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. १० दिवस हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी लढणाऱ्या रूबीने जगाचा अखेर निरोप घेतला. आता नवरा शोभितचाही जीवन आणि मृत्यूमधला संघर्ष सुरू आहे. त्याची अवस्थाही गंभीर आहे.
पत्नीची काळजी घेता घेता पतीही पडला आजारी
सांगितलं जातं की, रूबीला औषध आणि ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. नव्या वधुचा घर संसार फुलण्याआधीच सगळं संपलं. शोभितचीही अवस्था गंभीर आहे. रूबी आजारी पडल्यापासून शोभितने हॉस्पिटलमधून पाय काढला नाही. दिवसरात्र तिच्या सेवेसाठी तो राहिला. त्यामुळे त्यालाही ताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. स्वत:ची काळजी न घेतल्याने शोभितही आजारी पडला.