हळद झाल्यावर झोपायला गेलेल्या नव्या नवरीला सापाने मारला दंश, संसार सुरू होण्याआधीच संपला....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 12:13 PM2021-07-16T12:13:15+5:302021-07-16T12:13:34+5:30
हळदीचा कार्यक्रम झाल्यावर पूनम तिच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली. तिथे एक विषारी साप लपून बसला होता. या सापाने पूनमला दंश मारला आणि पूनमचा जागीच मृत्यू झाला.
झारखंडच्या धनबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे घरात लग्नाचा आनंद दु:खात बदलला. २३ वर्षीय पूनम कुमारीचं लग्न १६ जुलैला होणार होतं. घरात लग्नाची तयारी जोरात सुरू होती. बुधवारी रात्री हळदही जल्लोषात झाली. मुलीच्या लग्नामुळे परिवारातील लोकही आनंदी होते. मात्र, काही वेळाच पूनमला साप चावल्याने तिचा मृत्यू झाला.
हळदीचा कार्यक्रम झाल्यावर पूनम तिच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली. तिथे एक विषारी साप लपून बसला होता. या सापाने पूनमला दंश मारला आणि पूनमचा जागीच मृत्यू झाला. ज्या घरातून नवरीची आनंदाने पाठवणी केली जाणार होती त्या घरात वडील सत्येंद्र प्रसाद यांनी मुलीची तिरडी उचलली.
सापाने दंश मारल्यावर पूनम जोरात ओरडली. त्यामुळे परिवारातील लोक लगेच तिच्या रूममध्ये गेले आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ज्यानंतर गावात सगळीकडे दु:खाचं सावट पसरलं होतं. पूनमच्या परिवारातील लोकांनी सांगितलं की, ती बीएसएस महिला कॉलेज धनबादची विद्यार्थीनी होती. १६ जुलैला तिचं लग्न होणार असल्याने घरात आनंद होता. मात्र, साप चावल्याने पूनमचा मृत्यू झाला.
गावातील लोक म्हणाले की, पावसामुळे साप लोकांच्या घरात येऊन राहतात. या भागात सापाच्या दंशामुळे अनेक लोकांचे जीव गेले आहेत. पूनमच्या मृत्यूनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. भीतीमुळे लोकांना झोप येत नाहीये. लोकांना भीती आहे की, त्यांच्याही घरात येईल.
धनबाद आणि आजूबाजूच्या परिसरात सर्पदंशाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. प्रशासनाकडून लोकांना सतत इशारा दिला जातो. पण जंगलाच्या जवळ राहणाऱ्या लोकांना स्वत:ला सापापासून वाचवून ठेवणं अवघड आहे. त्यांना एका चुकीची किंमत जीव देऊन चुकवावी लागते.