"मी जळत्या बसमधून उडी मारली, आईला बाहेर खेचलं पण..."; नवरीने सांगितलं नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 02:43 PM2024-03-12T14:43:15+5:302024-03-12T14:52:05+5:30
रस्त्यात लग्नासाठी जात असलेल्या बसवर हायटेंशन वायर पडली आणि बसला आग लागली. बसला आग लागली तेव्हा वधूही त्या बसमधून प्रवास करत होती.
उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये बस दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण मऊ जिल्ह्यातून लग्नाची वरात घेऊन गाझीपूरच्या मरदह ब्लॉकमधील महाहर धामला जात होते. मात्र रस्त्यात लग्नासाठी जात असलेल्या बसवर हायटेंशन वायर पडली आणि बसला आग लागली. बसला आग लागली तेव्हा वधूही त्या बसमधून प्रवास करत होती. सुदैवाने आईमुळे ती थोडक्यात बचावली.
ही संपूर्ण घटना काल (11 मार्च) दुपारी घडली. मऊ येथील राणीपूर पोलीस स्टेशन परिसरातील नंदू सरोज यांची मुलगी खुशबू हिचा विवाह गाझीपूरच्या माधवपूर येथील रहिवासी रामायण सरोज यांचा मुलगा तेज बहादूर सरोज याच्यासोबत ठरला होता. गाझीपूर मरदह ब्लॉकच्या महाहर धाममध्ये असलेल्या प्रसिद्ध शिव मंदिरात हा विवाहसोहळा होणार होता.
मऊ येथील वधू पक्षाचे लोक बसमध्ये चढून महाहर धामकडे निघाले. लग्नाची मिरवणूक मंदिराजवळ पोहोचणार असतानाच बस हायटेंशन वायरच्या प्रभावाखाली आल्याने मोठी दुर्घटना घडली. बसमध्ये आग वेगाने पसरू लागली. जीव वाचवण्यासाठी लोक धावू लागले. घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. याच दरम्यान, वधू खुशबूच्या आईने तिला बसमधून ढकलून दिलं.
अपघाताबाबत बोलताना खुशबूने 'आज तक'ला सांगितलं की - जेव्हा माझ्या आईने मला धक्का दिला तेव्हा मी जळत्या बसमधून उडी मारली. पण मागे वळून पाहिलं तर आई स्वतः आगीत अडकली होती. यावर मी आईचा पाय धरून तिला बाहेर खेचलं. तोपर्यंत ती गंभीररीत्या भाजली होती. सर्वत्र आरडाओरडा झाला. बसमध्ये आग वेगाने पसरत होती. चालकाचा मृत्यू झाला होता. माझ्या आईमुळे मी वाचले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाझीपूर बस दुर्घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5-5 लाख रुपये आणि जखमींना 50-50 रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. या घटनेमुळे वधू-वर परिवारासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.