बहिणीचे चुंबने घेतल्याने वधूने लग्नास दिला नकार
By admin | Published: May 29, 2015 01:41 PM2015-05-29T13:41:23+5:302015-05-29T15:52:59+5:30
कानपूरमधील लग्नसोहळ्यात सास-याने भर मंडपात वधूच्या बहिणीचे चुंबन घेतल्याने वधूने लग्नास नकार दिल्याची घटना समोर आली आहे.
ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. २९ - कानपूरमधील लग्नसोहळ्यात सास-याने भर मंडपात वधूच्या बहिणीचे चुंबन घेतल्याने वधूने लग्नास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वधूच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल न केल्याने चुंबनवीर सास-याची तुरुंगवारी टळली आहे.
फरुखाबाद जिल्ह्यातील नागला खैरबंद या गावात राहणा-या परमेश्वरी दयाल यांच्या कन्येचा विवाह नेहरुनगर येथील बाबूराम यांचा मुलगा राजेश याच्याशी ठरला होता. लग्नाच्या दिवशी वाजत गाजत वरात लग्नमंडपात दाखल झाली. वधू - वर वरमाला घालण्यासाठी मंचावरही आले. मात्र नेमक्या त्याच वेळी वराच्या वडिलांनी वधूच्या चुलत बहिणीचे सर्वांसमक्ष चुंबन घेतले. हा प्रकार बघून वधू पक्षातील मंडळीचा पारा चढला. वधूनेही चुंबनवीर सास-याला दणका देत लग्न करण्यास नकार दिला. आपली चुक लक्षात वराच्या वडिलांनी त्या मुलीची माफीदेखील मागितली. मात्र वधू तिच्या निर्णयावर ठाम होती. वरपक्षाने लग्नासाठी झालेला खर्च व लग्नात आलेल्या भेटवस्तू परत देण्याची अट घातली. वधूच्या नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा बघून वरपक्षातील मंडळीही नरमली व त्यांनी गपगुमान खर्च, भेटवस्तू सर्व काही परत दिले. याप्रकरणी आमच्याकडे कोणीही तक्रार दाखल केलेली नाही असे पोलिसांनी सांगितले.