नवरी सतत व्हॉट्सअॅपवर मग्न; नवऱ्यानं मुहूर्तावर मोडलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 12:38 PM2018-09-09T12:38:30+5:302018-09-09T12:39:35+5:30
मेसेजिंग अॅपवर चॅटींग करणं एका तरुणीला चांगलच महागात पडलं आहे.
लखनौ - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं उत्तम माध्यम असल्याने अनेक जण सतत व्हॉट्सअॅपवरच मग्न असतात. मात्र मेसेजिंग अॅपवर चॅटींग करणं एका तरुणीला चांगलच महागात पडलं आहे. नवरी सतत व्हॉट्सअॅपवर चॅट करत असते या कारणामुळे एका नवरदेवाने चक्क लग्नासाठी नकार दिल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यामध्ये ही घटना घडली.
लग्नमंडपात लग्नाचे विधी सुरू होण्याच्या काही वेळ आधी नवरदेवाने लग्नाला नकार दिला. नवऱ्याकडील मंडळींनी नवरीच्या कुटुंबीयांना फोन करून लग्न मोडल्याचे कळविले. याप्रकरणी नवरीच्या वडिलांनी हुंडा दिला नाही म्हणून लग्न मोडल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे.
नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांनी 65 लाखांचा हुंडा मागितल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. मात्र नवऱ्याकडच्या मंडळींनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नवरी सतत मेसेजिंग अॅपवर व्यस्त असायची. त्यामुळे तिच्या याच सवयीला कंटाळून लग्न मोडल्याचं नवऱ्याने सांगितलं. तसेच नवरीने आपल्या अनेक नातेवाईकांनाही मेसेज केल्याची माहिती नवरदेवाने पोलिसांना दिली.