सात जन्माचं नातं 7 दिवसांत तुटलं; पतीसोबत हनिमूनला आलेली पत्नी इंटरव्हलनंतर थिएटरमधून पळाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 12:17 PM2023-07-05T12:17:42+5:302023-07-05T12:20:40+5:30
थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. मात्र इंटरवलदरम्यान तो खाद्यपदार्थ आणण्यासाठी बाहेर गेला होता. पण परत आल्यावर पत्नी तेथून बेपत्ता असल्याचं दिसलं.
राजस्थानमधील जयपूरमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एक पती पत्नी हरवल्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसात गेला. त्याने सांगितले की, दोघेही थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. मात्र इंटरवलदरम्यान तो खाद्यपदार्थ आणण्यासाठी बाहेर गेला होता. पण परत आल्यावर पत्नी तेथून बेपत्ता असल्याचं दिसलं. पोलीस विवाहितेचा शोध घेतच होते याच वेळी ती स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचली.
पत्नीने सांगितले की, ती या लग्नात खूश नव्हती. त्यामुळेच तिने पतीला सोडून थिएटरमधून पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, सीकरचा तरुण लग्नानंतर 7 दिवसांनी आपल्या वधूसोबत हनिमूनसाठी जयपूरला आला होता. येथे त्याने हॉटेलमध्ये रूम बुक केली. मग पिंक स्क्वेअर मॉलमध्ये बायकोसोबत सिनेमा पाहण्याचा प्लॅन बनवला. त्यांनी दुपारी 12 च्या शोसाठी तिकीट बुक केलं. पती-पत्नी चित्रपट पाहायला गेले.
चित्रपटाचा 1:30 वाजता इंटरवल झाला. पती पत्नीसाठी काही खाद्यपदार्थ आणण्यासाठी गेला. तेव्हाच पत्नीने मागून पळ काढला. पतीने परत येऊन पाहिले असता त्याला धक्काच बसला. बायको नव्हती. त्याने आपल्या पत्नीचा थिएटर आणि मॉलमध्ये शोध घेतला. पण ती कुठेच सापडली नाही. त्याने पत्नीला अनेकदा फोन केला. पण फोन स्वीच ऑफ येत होता. अनुचित प्रकाराच्या भीतीने पतीने पोलीस ठाणे गाठले. त्याने हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आणि पत्नीच्या हरवल्याची तक्रार दाखल केली.
संपूर्ण प्रकरणाला आणखी एक ट्विस्ट आला. सिनेमा हॉलमधून पळून गेलेली नववधू काही तासांनंतर जयपूरमधील शाहपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. जिथे तिने सांगितले की ती या लग्नाने खूश नाही, त्यामुळे हॉलमध्ये संधी मिळताच तिने पतीला सोडून तेथून पळ काढला. यानंतर ती बसमध्ये बसून शाहपुरा येथे आली. वधूला भेटल्यानंतर शाहपुरा पोलिसांनी आदर्शनगर पोलिसांना माहिती दिली. दोन्ही कुटुंबं वधूची समजूत घालण्यात व्यस्त आहेत. सात जन्म एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेणारे हे नातं अवघ्या 7 दिवसांत तुटण्याच्या मार्गावर आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.