गुजरातमध्ये वरात आलेली दारात; पण प्यायलाही पाणी नव्हते...वाचा पुढे काय घडले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 01:57 PM2019-05-09T13:57:16+5:302019-05-09T13:58:32+5:30
संखेडा तालुक्यात नरेश तडवी यांच्या मुलाचे मंगळवारी लग्न होते. मात्र, रोज सायंकाळी भारनियमन होते, तेथे सकाळीच वीज गायब झाली.
बडोदा : सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. वरात दारात आली आणि पाणीच नसेल तर वर-वधू पक्षावर काय परिस्थिती ओढवेल याचे प्रत्यंतर गुजरातच्या छोटा उदयपुर जिल्ह्यातील एका गावामध्ये आले. वरात दारात यायची असताना वीजच गायब झाली यामुळे बोअरवेलमधून वरपक्षाकडील मंडळी पाणीच काढू शकले नाहीत. आता 1000 लोकांच्या जेवणापासून पिण्याच्या पाण्याचा यक्षप्रश्न निर्माण झाला होता. एक आयडिया सुचली आणि हा प्रश्न गावकऱ्यांनी सोडविला.
संखेडा तालुक्यात नरेश तडवी यांच्या मुलाचे मंगळवारी लग्न होते. मात्र, रोज सायंकाळी भारनियमन होते, तेथे सकाळीच वीज गायब झाली. यामुळे एवढ्या वऱ्हाडींसाठी पाणी कोठून आणायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. लग्न मंडपातून वऱ्हाडींना उपाशी पाठवायचे का? या विचारानेच चिंतेचे ढग त्यांच्या डोळ्यासमोर दाटू लागले. तडवी कुटुंबियांना गावातील प्रत्येक घरामध्ये घागरी घेऊन जलदान करण्यासाठी विनवणी करण्याची वेळ आली. लग्नामध्ये सजाधजायचे सोडून हे कुटुंबीय दारोदारी भटकू लागले होते.
गावात एकच हातपंप होता. त्यावरून एवढ्या मंडळींसाठी पाणी काढायचे म्हटले तर दिवस लागणार होता. यामुळे दारोदारी जाऊन पाणी मागितल्याचे तडवी यांनी सांगितले. लोकांनी पाणी टंचाई असूनही दोन घागरी पाणी दिले. शेवटी गावाची आणि वरपक्षाची इज्जत वाचविण्यासाठी गावकऱ्यांनीच प्रत्येक घरातून दोन दोन घागरी पाणी जमा केले.
आम्हाला असे दोन ड्रम भरून पाणी मिळाले. शिवाय अतिरिक्त पाण्यासाठी गावातील महिलांनी रांग लावून हातपंपातून पाणी उपसले. तोपर्यंत दुपार झाली होती. हजाराच्या आसपास वऱ्हाडी, पाहुणेमंडळी मंडपात दाखल झाले होते. गावकऱ्यांच्या मदतीमुळे मुलाचा विवाह संपन्न झाल्याचे तडवी यांनी सांगितले.
पाण्याची समस्या बिकट
गुजरातमधील हा आदिवासी भाग आहे. येथे कायमच पाण्याची टंचाई असते. अनेकदा लग्न समारंभ असल्यावर नववधूही पाहुण्यांच्या पाण्यासाठी हातपंपावर पाणी उपसताना दिसतात.