भरधाव कार जात असताना मधून मोडून पडला नदीवरील ब्रिज, सुदैवाने टळली मोठी दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 01:42 PM2021-11-29T13:42:09+5:302021-11-29T13:42:55+5:30
Accident News: उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरला दिल्लीशी जोडणाऱ्या हायवेवर असलेला कोलाघाट ब्रिज तुटून मोठी दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार जलालाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामगंगा कोलाघाट पुलाचा भाग तुटून खाली पडला.
लखनौ - उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरला दिल्लीशी जोडणाऱ्या हायवेवर असलेला कोलाघाट ब्रिज तुटून मोठी दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार जलालाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामगंगा कोलाघाट पुलाचा भाग तुटून खाली पडला. हा अपघात रात्री उशिरा घडला. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. दरम्यान, ही दुर्घटना घडली तेव्हा ब्रिजवरून एक कार जात होती. ही कार तुटलेल्या ब्रिजसोबत खाली गेली. मात्र सुदैवाने या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्यांना मोठी दुखापत झाली नाही. त्यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र या अपघातामुळे शाहजहांपूर-बदायूँ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
या दुर्घटनेबाबत शाहजहाँपूरचे जिल्हाधिकारी इंद्र विक्रम सिंह यांनी सांगितले की, या पुलाचा एक पाया आधीपासून खचलेला होता. त्याची दुरुस्ती केली गेली होती. मात्र ते काम फारसे यशस्वी झाले नव्हते. त्यामुळे पुलाचा एक भाग अजून खाली खचला होता. आता अभियंत्यांनी घटनास्थळावर पोहोचून पुलाला पुन्हा कार्यान्विक करण्यासाठी काम सुरू केले आहे.
२००७ मध्ये बसपाच्या सत्ताकाळात बांधला गेलेला कोलाघाट ब्रिज शाहजहाँपूर आणि बदायूँ या भागांना जोडतो. त्यावरून सातत्याने वाहतूक सुरू असते. हे पूल अनेक वर्षांपासून जर्जर झाले होते. देल्या महिन्यात हा पूल मधून खचला होता. त्यानंतर सुमारे एक आठवड्यापर्यंत पुलाच्या दुरुस्तीचे काम चालले. यादरम्यान, पुलाच्या दोन्ही बाजूला भक्कम भिंत बांधण्यात आली. मात्र पुलाची पुन्हा तपासणी न करण्यात आल्याने पुल कोसळला. या दुर्घटनेमुळे शाहजहांपूर-दिल्ली महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.