उत्फुल्ल वातावरणामुळे प्रकाशोत्सवाला आगळा रंग
By Admin | Published: October 30, 2016 10:46 PM2016-10-30T22:46:41+5:302016-10-30T22:46:41+5:30
>पुणे : दिवाळीचा परमोच्चबिंदू असलेला लक्ष्मीपुजनाचा सण आज सायंकाळनंतर अतिशय उत्साहात साजरा झाला. मनामनातला अंधार दूर करणा-या प्रकाशोत्सवाचे उत्फुल्ल वातावरणात स्वागत झाले. घरोघर फुलांच्या, आंब्याच्या तोरणमाळा लावून लक्ष्मीचे स्वागत करण्यात आले. सुरेख सजलेल्या रांगोळ्यांमुळे, मंद तेवणा-या पणत्यांमुळे देखणेपणा ल्यायलेल्या घरांचे रुप दृष्ट लागेल असे दिसत होते. अमावस्येच्या रात्री शहराचा आसमंतात प्रकाशात न्हाऊन निघाला होता. अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपुजन साजरे होते. त्यासाठी पुणेकर शनिवारपासूनच सज्ज होते. आज रविवारचा दिवस असल्याने सकाळपासूनच शहरावर निवांतपणाची छाया होती. घरातच थांबून कुटुंबियांसह सणाचा आनंद घेतला गेला. सायंकाळच्या लक्ष्मीपुजनाची तयारी दुपारीच केली जात होती. गोडधोड पक्वान्नांचा नैवेद्य दाखविल्यानंतर भरगच्च भोजन भोजनाचा स्वाद घेतल्यानंतर पुणेकरांनी काहीशी वामकुक्षी घेतली. सूर्य पश्चिम क्षितीजाकडे झुकू लागताच दारांवर पिवळ्याधमक , केशरी झेंडुच्या माळा लावण्यात आल्या. अंगणात रांगोळी काढण्यात आली. सकाळनंतर मालविलेले आकाशदिवे पुन्हा झगमगू लागले. सायंकाळी ६ ते रात्री पावणेनऊ दरम्यान लक्ष्मीपूजनाचा मुहुर्त होता. अमावस्या अशुभ मानली जाते. मात्र अश्विन अमावस्या आनंदी असते. त्यामुळे व्यापारी वर्गाने दुपारीच व्यवहार बंद करुन पुजेची तयारी सुरु केली. सायंकाळी महत्वाच्या बाजारपेठांमध्ये पुजेचे वातावरण दिसत होते. घरोघरच्या आणि व्यापारी पेढ्यांमधील पुजा पूर्ण होताच फटाक्यांच्या धमाक्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. आकाशात होणारी आतषबाजी डोळे खिळवून ठेवत होती. अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मीचा सर्वत्र संचार असतो अशी आणि आजच्या रात्री घरातील केर झाडून बाहेर टाकावा, दारिद्रय निस्सारण करावे अशी श्रध्दा असल्याने रात्री उशीरापर्यंत पुणेकरांमध्ये जाग होती. आज दिवाळीचा परमोच्चबिंदू असल्याने आप्त मित्रांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष म्हणजे सोशल मिडीयावरुन भेटून शुभेच्छा दिल्या जात होत्या. या सा-या वेळेत सार्वजनिक वाहतूक कमालीची मंदावली. रस्त्यांनीही जणू विश्रांती घेत उत्सवाच्या आनंदात सहभाग नोंदविला.