ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात 25 जणांनी दिली साक्ष, पुरावा म्हणून फक्त फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 12:27 PM2023-06-15T12:27:33+5:302023-06-15T12:28:54+5:30
महावीर आखाड्यातील सर्व लोकांनी ब्रिजभूषण यांच्या विरोधात जबाब नोंदवले आहेत.
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात 25 जणांनी साक्ष दिली आहे. यामध्ये पीडित कुस्तीपटू, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बजरंग पुनिया, प्रशिक्षक, रेफ्री आणि रोहतक येथील महावीर आखाड्याचे लोक यांचा समावेश आहे.
महावीर आखाड्यातील सर्व लोकांनी ब्रिजभूषण यांच्या विरोधात जबाब नोंदवले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे. दिल्ली पोलीस आता या प्रकरणी आरोपपत्र दाखल करणार आहे. अल्पवयीन कुस्तीपटूने दाखल केलेला पोक्सो खटला बंद करण्याची तयारी सुरू आहे. अल्पवयीन पीडितेने भारतीय कुस्ती महासंघावरील आरोप आरोप मागे घेतले आहेत.
या प्रकरणी पोलिस गुरुवारी क्लोजर रिपोर्ट दाखल करणार आहेत. दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांचे म्हणणे आहे की, दोन कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघाने दिल्ली पोलिसांना फक्त फोटो दिले आहेत. हे सर्व फोटो तपासले आहेत. यामध्ये काहीही आक्षेपार्ह बाहेर येत नसून केवळ आरोपींची उपस्थिती दिसून येत आहे. तपासात एकही व्हिडिओ सापडला नाही.
हा व्हिडिओ पीडित कुस्तीपटूंनी किंवा भारतीय कुस्ती महासंघाने दिला नाही, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच, एका वरिष्ठ पोलिस सूत्राने सांगितले की, दिल्ली पोलिसांकडे फक्त पीडित महिला कुस्तीपटूंचे जबाब, 25 लोकांची साक्ष आणि आरोपी ब्रिजभूषण यांच्याविरुद्धचे फोटो आहेत. अशा परिस्थितीत पोलीस चार्जशीट कम स्टेटस रिपोर्ट न्यायालयात सादर करणार आहेत.