दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 03:44 PM2024-05-30T15:44:54+5:302024-05-30T15:47:16+5:30
भाजप उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील एका वाहनाने ३ मुलांना चिरडले.
Brij Bhushan Singh News : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद सांभाळणारे ब्रिजभूषण शरण सिंह नाना कारणांनी चर्चेत असतात. नामांकित महिला पैलवानांनी केलेले गंभीर आरोप, आंदोलनं यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. यावेळी त्यांचे भाजपाने तिकीट कापले असून त्यांच्या मुलाला लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. बुधवारी उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील एका वाहनाने ३ मुलांना चिरडल्याची घटना घडली. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. करण भूषण सिंह हे या मतदारसंघातील विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे पुत्र आहेत.
विशेष बाब म्हणजे अपघातानंतर, करण भूषण घटनास्थळी थांबले नाही. मात्र, पोलीस स्कॉर्ट असे लिहिलेली फॉर्च्युनर कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. महत्वाचे म्हणजे, जिल्ह्यातील करनैलगंज कोतवाली भागातील करनैलगंज हुजूरपर मार्गावर खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा आणि कैसरगंजचे भाजप उमेदवार करण भूषण यांचा ताफा हुजूरपूरच्या दिशेने जात होता. याच वेळी वैकुंठ महाविद्यालयाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या तीन मुलांना करण भूषण यांच्या ताफ्यातील एका फॉर्च्युनर वाहनाने चिरडले.
दोन मुलांचा जागीच मृत्यू
दरम्यान, या घटनेवर बोलण्यास प्रथमत: ब्रिजभूषण यांनी नकार दिला. मग त्यांची मुजोरी पाहायला मिळाली. माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी उत्तर न देता "तुम्ही घरी या तिथे बोलू", असे म्हटले. त्यानंतर त्यांनी कशीबशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, करण सिंह यांच्या वाहनांचा ताफा जात असताना ३-४ किमी अंतर व्यापले होते. यात अपघात झाला आणि मुलांचा मृत्यू झाला हे वेदनादायी आहे. तुम्ही माझ्या मुलाला गुन्हेगार बनवा. अपघातात मृत झालेली मुले काही महिलांशी वाद घालून आली होती. तितक्यात त्यांची ताफ्यातील वाहनाशी टक्कर झाली. या अपघाताची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल.
अपघाताच्या घटनेनंतर करण भूषण यांचा ताफा तेथे थांबला देखील नाही, ना करण भूषण यांनी उतरून मुलांची स्थिती जाणण्याचा प्रयत्न केला. ताफा मुलांना चिरडून निघून गेला आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तसेच कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी तिसऱ्या मुलाला रुग्णालयात दाखल केले.