विनेश फोगट मंथरा! ब्रिजभूषण सिंहांनी स्वतःची तुलना केली प्रभू श्रीरामांशी; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 05:58 PM2023-05-23T17:58:43+5:302023-05-23T18:01:22+5:30
Brij Bhushan Singh: देवाने माझ्यासाठी काही वेगळे काम निर्धारित केले आहे, असे सांगत ब्रिजभूषण सिंह यांनी स्वतःची तुलना प्रभू श्रीरामांशी केली आहे.
Brij Bhushan Singh: कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष तथा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात नामांकित पैलवानांनी सुरू केलेले आंदोलन अद्यापही सुरूच आहे. २३ मे रोजी या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. ब्रिजभूषण यांनी महिला पैलवानांसह, महिला प्रशिक्षकांचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक करेपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका पैलवानांची आहे. मात्र, यातच आता एका कार्यक्रमात बोलताना ब्रिजभूषण सिंह यांनी स्वतःची तुलना प्रभू श्रीरामांशी केली असून, विनेश फोगट मंथरा असल्याचे संबोधले आहे.
ब्रिजभूषण सिंह यांनी नार्को टेस्ट करण्याचे आव्हान पैलवानांना दिले होते. पैलवानांनी हे आव्हान स्वीकारून सर्वकाही सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली लाईव्ह व्हावे, असे म्हटले आहे. यातच ब्रिजभूषण यांनी स्वतःची तुलना प्रभू श्रीरामांशी केल्यानंतर आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रभू रामाला मंथराने १४ वर्षे वनवासाला पाठवले होते. परंतु राम वनवासाला गेले नसते तर काही गोष्टी अपूर्ण राहिल्या असल्या. जसे राम कधी केवटाला भेटले नसते, शबरीची बोरे खाल्ली नसती आणि हनुमान आणि सुग्रीवशी त्यांची मैत्री झाली नसती आणि शेवटी पापी रावणाची अंत झाला नसता, असे ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटले आहे.
जे आरोप माझ्यावर झाले आहेत, तसा मी नाही
देवाने माझ्यासाठी काही वेगळे काम निर्धारित केले आहे. मी सगळे असेल परंतु जे आरोप माझ्यावर झाले आहेत, तसा मी नाही, असे ब्रिजभूषण सिंह यांनी सांगितले. तसेच लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे लोक आत्महत्या करतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही या कायद्यामुळे हैराण झाले आहेत. आता या वयात मला दुसरी लढाई लढायची आहे. आम्ही पैलवानांवर करोडो रुपये खर्च केले. जे लोक पाया पडून आशिर्वाद घेत होते, त्यांची भाषा आता बदलली आहे, अशी टीकाही ब्रिजभूषण सिंह यांनी केली आहे.
दरम्यान, मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना ब्रिजभूषण यांनी पैलवानांवर बोचरी टीका केली. देशातील खरे खेळाडू मैदानात सराव करत असून जे जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत, त्यांचा खेळ संपला असल्याचे सिंह यांनी सांगितले. तसेच आंदोलक पैलवान पुढे जाऊन खेळणार नाहीत, ते आता निवडणुक लढवतील. कुस्ती महासंघात अशा घटना घडल्या असतील तर त्यांनी या आधी प्रश्न का विचारला नाही, असा सवालही त्यांनी केला.