मेरी कॉम आणि योगेश्वर दत्तसह 7 सदस्य करणार ब्रिजभूषण सिंहविरोधातील आरोपांची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 09:04 PM2023-01-20T21:04:55+5:302023-01-20T21:05:03+5:30
दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या तीन दिवसांपासून पैलवानांचे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या तीन दिवसांपासून भारतातील दिग्गज कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात हे आंदोलन सुरू आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगटने ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण आणि छळाचे आरोप केले आहेत. तसेच, हे सर्व आंदोलक कुस्तीपटू ब्रिजभूषण यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
यातच आता, कुस्ती महासंघ आणि कुस्तीपटूंमधील वादात भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) मोठा निर्णय घेतला आहे. IOA ने WFI चे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सदस्यांमध्ये मेरी कोम, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव आणि 2 वकिलांचा समावेश आहे.
आयओएने शुक्रवारी मोठी बैठक बोलावली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गंभीर बाब असल्याचे आयओएने म्हटले आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करणार आहोत. आम्ही सर्व संबंधित पक्षांना बोलावून म्हणणे ऐकून घेऊ, असे आयओएने म्हटले आहे. दरम्यान, चौकशीसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
यापूर्वी क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघ आणि अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना 72 तासांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या वतीने जबाब नोंदवण्यात आला आहे. ब्रिजभूषण यांचा मुलगा प्रतीक भूषण सिंह याने याबाबत माहिती दिली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही नोटीस बजावली आहे. दरम्यान, ब्रिजभूषण यांनी राजीनामा देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.