शानदार ‘श्रीगणेशा’
By admin | Published: February 1, 2015 02:29 AM2015-02-01T02:29:03+5:302015-02-01T02:29:03+5:30
आयोजनातील अनेक कामे अपूर्ण राहिल्याने निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ३५व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेचे शानदार उद्घाटन शनिवारी झाले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : सचिन तेंडुलकर आकर्षण; कलावंतांची सांस्कृतिक मेजवानी
तिरुअनंतपुरम : आयोजनातील अनेक कामे अपूर्ण राहिल्याने निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ३५व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेचे शानदार उद्घाटन शनिवारी झाले. या स्पर्धेचे ब्रँडदूत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे मुख्य आकर्षण होते.
सचिनची एक झलक पाहायला उत्सुक क्रीडाप्रेमींच्या साक्षीने तब्बल ५ हजार कलावंतांनी केरळच्या सांस्कृतिक तसेच सांगीतिक परंपरेची मेजवानी देत १६१ कोटी रुपये खर्चून बनविण्यात आलेल्या शहराबाहेरील ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये ३ तास चाललेला हा सोहळा संस्मरणीय ठरविला.
अनेक स्टार खेळाडूंनी स्पर्धेकडे पाठ फिरविल्याने रंगत कमी होणार की काय, अशी चर्चा होती; पण सचिन आकर्षण असल्याने उत्साहाला उधाण आले होते. केंद्रीय शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू आणि क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह अनेक माजी खेळाडूंची विशेष उपस्थिती राज्याचा आणि देशाचा गौरव असलेल्या अॅथलिट पी. टी. उषा तसेच अंजू बॉबी जॉर्ज यांच्याकडे सचिनने क्रीडाज्योत सुपूर्त केल्यावर त्यांनी ज्योत प्रज्वलित करताच स्पर्धेचा श्रीगणेशा झाला. केरळच्या ७ जिल्ह्यांत ३० वेगवेगळ्या स्थानांवर होणाऱ्या स्पर्धेतील क्रीडाप्रकारांत १० हजार खेळाडू सहभागी झाले आहेत.
सोहळ्याची सुरुवात विविध राज्य संघांच्या पथसंचलनाद्वारे झाली. ३० राज्ये, ५ केंद्रशासित प्रदेश तसेच एक बोर्ड पथसंचलनात सहभागी झाले. त्यात मागील स्पर्धेचा यजमान झारखंडचे पथक पहिल्या स्थानावर होते. त्यापाठोपाठ गतविजेत्या सेनादलाच्या पथकाचे आगमन झाले. पथसंचलनानंतर ‘इंडिया सिंगिंग’ हा कार्यक्रम सादर झाला. त्यात प्रसिद्ध गायक उदित नारायण, अल्का याज्ञिक, सुजाता हरिहरन यांनी गाणी सादर करताच कलावंतांनी नृत्य आणि पारंपरिक कलांचे सादरीकरण केले.
क्रीडामंत्री सोनोवाल म्हणाले, ‘‘या स्पर्धा यशस्वी होतील, याची मला खात्री आहे. स्टेडियममध्ये ज्या प्रकारचा उत्साह आहे तो बघता, बाहेर चाललेल्या घडामोडींवर अभावानेच कुणाचे लक्ष गेले असेल.’’ स्टेडियममध्ये सर्वाधिक टाळ्या पडल्या त्या सचिनसाठीच! सचिनने दोन वेळा उभे राहून चाहत्यांना अभिवादन केले. या प्रसंगी केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांचीही उपस्थिती होती. (वृत्तसंस्था)
१,३६९ पदकांसाठी चढाओढ
३५व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत ४१४ सुवर्णांसह एकूण १,३६९ पदके असतील. यंदाच्या स्पर्धेतून कराटे आणि सेपक टॅकरॉ हे खेळ वगळण्यात आले आहेत. वुशू, ज्यूजो, सायकलिंग, बीच व्हॉलिबॉल यासारख्या खेळांच्या पदकांची संख्यादेखील कमी करण्यात आली. दुसरीकडे नेमबाजी, खो-खो, रग्बी, कुस्ती आणि कयाकिंग या खेळांचा समावेश करण्यात आल्याने पदकसंख्या वाढली. सर्वाधिक १४४ पदके जलतरणात आणि त्याखालोखाल १३२ पदके अॅथलेटिक्समध्ये असतील.
क्रीडाग्राममध्ये कामे अपूर्ण
खेळाडूंच्या निवासासाठी असलेल्या क्रीडाग्राममधील कामे अपूर्ण राहिल्याने अनेक खेळाडू अद्याप क्रीडाग्रामपासून अलिप्त आहेत. याशिवाय, क्रीडा सुविधांवरदेखील अखेरचा हात फिरलेला नाही. खेळाडूंसाठी सोयी पुरविण्यास उशीर होत असल्यामुळे आयोजकांची तारांबळ उडाली. वेळेवर धावाधाव करून खेळाडूंना स्पर्धा सुरू होण्याआधी आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी कर्मचारी यंत्रणा खडबडून जागी झाली.