‘इसिस’मध्ये गेलेला माझा मुलगा परत आणा; काश्मीरमध्ये वडिलांची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 03:44 AM2019-06-03T03:44:19+5:302019-06-03T06:17:42+5:30
अदिल अहमद असे या पदवीधर मुलाचे नाव असून तो काश्मीरचा रहिवासी आहे
श्रीनगर : दहशतवादी संघटना इसिसला जाऊन मिळालेल्या आणि सध्या सिरियात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैैन्य आघाडीच्या ताब्यात असलेल्या माझ्या मुलाला परत आणावे, अशी विनंती काश्मीरच्या फय्याज अहमद यांनी राज्य सरकारला केली आहे. ही विनंती जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी केंद्र सरकारकडे पाठविली आहे.
अदिल अहमद असे या पदवीधर मुलाचे नाव असून तो काश्मीरचा रहिवासी आहे, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. अदिल अहमदने ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधून एमबीए पूर्ण केले. यावर्षीच्या प्रारंभी इसिसच्या अनेक दहशतवाद्यांनी शरणागती पत्करली त्यांच्यात अदिल होता. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील दलांनी सिरियात त्यांना ताब्यात घेतले. २०१३ मध्ये अहमद सिरियात गेला व तेथे त्याने मी स्वयंसेवी संस्थेसोबत काम करीत असल्याचे कुटुंबियांना सांगितले होते. अदिलचे वडील फय्याज अहमद हे कंत्राटदार असून ते डिपार्टमेंटल स्टोअर्सही चालवितात.
फय्याज अहमद यांचा अर्ज पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी केंद्रीय सुरक्षा संस्थांकडे पाठवण्यात आला आहे, असे अधिकारी म्हणाला. जर अदिलला परत आणता आले तर तो आम्हाला इसिसची कार्यपद्धती आणि तिच्या घातक योजनांची सविस्तर माहिती देऊ शकेल, असे अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले. सिरियात अदिल अहमद याच्यासह इसिसचे काही दहशतवादी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीला शरण आल्यापासून तुरुंगात आहेत.
अजूनही त्यांचा विश्वास बसत नाही
इसिससारख्या दहशतवादी संघटनेत आपला मुलगा दाखल होतो यावर अजूनही फयाज अहमद यांचा विश्वास बसत नाही. आज ते त्याला घरी परत आणण्यासाठी त्यांना शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत. नवी दिल्लीत नवे सरकार स्थापन झाल्यामुळे माझा मुलगा परत आणण्याच्या कामाला वेग येईल अशी आशा मला आहे, असे ते म्हणाले.