मुलांना आणा ऑफीसमध्ये, मंत्रालय करणार देखभाल
By admin | Published: April 12, 2015 12:59 PM2015-04-12T12:59:31+5:302015-04-12T12:59:31+5:30
केंद्र सरकारमधील मंत्रालयांमध्ये काम करणा-या महिला कर्मचारी व अधिका-यांना आता त्यांच्या लहान मुलांनाही ऑफीसमध्ये नेता येणार आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - केंद्र सरकारमधील मंत्रालयांमध्ये काम करणा-या महिला कर्मचारी व अधिका-यांना आता त्यांच्या लहान मुलांनाही ऑफीसमध्ये नेता येणार आहे. केंद्र सरकारने प्रत्येक मंत्रालयात लहान मुलांसाठी एक स्वतंत्र कक्ष उभारण्याच्या हालचाली सुरु केल्या असून मंत्रालयात काम करणा-या महिला त्यांच्या लहान मुलांना या कक्षात ठेवता येणार आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रत्येक मंत्रालयाच्या सचिवांना त्यांच्या विभागात काम करणा-या महिलांची एक यादी तयार करण्यास सांगितले आहे. या यादीमध्ये लहान मुल असलेल्या महिला कर्मचा-यांचाच समावेश असेल. मंत्रालयात असा कक्ष सुरु करण्यासाठी किमान 15 महिला कर्मचा-यांची आवश्यकता असेल. मंत्रालयात लहान मुलं असलेल्या 15 महिला असतील त्या मंत्रालयात लहान मुलांसाठी एक कक्ष निर्माण करावे लागेल. संबंधीत महिला दररोज त्यांच्या मुलांनाही ऑफीसमध्ये आणू शकतील. कक्षात या मुलांची देखभाल करण्यासाठी एक प्रशिक्षित नर्स नेमली जाईल. या नर्सचा पगार संबंधीत मंत्रालयालाच द्यावा लागेल. केंद्र सरकारचे कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालय या कक्षाच्या निर्मितीसाठी पाच लाख रुपये देईल. या कक्षात लहान मुलांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत ठेवता येईल.