"जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत भाजपाला बंगालमध्ये येऊ देणार नाही", ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 05:18 PM2021-02-10T17:18:57+5:302021-02-10T17:47:07+5:30
West Bengal Assembly Election 2021 : भाजपाला सत्तेत आणणे म्हणजे दंगली वाढविण्यासारखे आहे, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पार्टी आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. भाजपाला सत्तेत आणणे म्हणजे दंगली वाढविण्यासारखे आहे, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भाजपावर हल्लाबोल केला आहे. (Mamata Banerjee Mocks BJP's Roadshow Politics)
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "जर तुम्हाला दंगली हव्या असतील तर भाजपाला नक्कीच मतदान करा. मात्र, तुम्ही ममता बॅनर्जीला पराभूत करु शकत नाही, कारण, ती एकटी नाही. तिला लोकांचा पाठिंबा आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी भाजपाला येथे येऊ देणार नाही."
याचबरोबर, मंगळवारी भाजपा खोटी आश्वसने देत आहे. शेतकऱ्यांना पैसे देत नाही, असा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला होता. तसेच, राज्यातील तृणमूल काँग्रेस सरकार प्रत्येक शेतकऱ्याला पाच हजार रुपये देत असून त्यांच्यासाठी विनामूल्य पीक विम्याचीही व्यवस्था केली आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते.
याशिवाय, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावर टीका करत 'भाजपाने सोनार भारत नष्ट केला आहे आता सोनार बांग्लाच्या गोष्टी करत आहेत' अशी खरमरीत टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली होती. तसेच, ज्यांनी देश विकायला काढलाय त्यांनी पश्चिम बंगालवर नजर टाकण्याअगोदर आरसा पाहायला हवा, अशी चपराकही त्यांनी भाजपाला लगावली होती.
ममता बॅनर्जी यांची केंद्र सरकारवर टीका
दोन दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका करत किसान सन्मान योजनेचा निधी अद्याप आला नसल्याचा दावा केला होता. ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत बोलताना सांगितले होते की, राज्य सरकारकडून केंद्र सरकारला २.५ शेतकऱ्यांची नावे पाठवली होती. मात्र, अद्यापही पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी राज्याला मिळाला नाही. केंद्राकडून राज्य सरकारला सहा लाख अर्ज पडताळणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी २.५ लाख अर्ज शेतकऱ्यांचे आहेत, असे ममता बॅनर्जी यांनी नमूद केले होते.
ममता बॅनर्जी सरकारने बंगालची संस्कृती संपुष्टात आणली - जेपी नड्डा
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मंगळवारी परिवर्तन यात्रेत संबोधित करताना ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. ममता बॅनर्जी सरकारने बंगालची संस्कृती संपुष्टात आणल्याचे जेपी नड्डा म्हणाले. ममता दीदी राज्यातील जनतेला परिवर्तन हवे आहे. ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालचा विकास नकोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगालला येतात. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात बंगालचा विकास होईल. आम्ही मोकळ्या हाताने येत नाही, तर प्रकल्प घेऊन येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुमारे ४ हजार ७०० कोटींचे प्रकल्प बंगालला दिले, असे सांगतममता बॅनर्जींना केवळ हुकूमशाहीची चिंता असल्याचा दावा जेपी नड्डा यांनी केला.